नव्याची नवलाई संपली, दोन हजारांची नोट नकोशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

यावर्षी कडाक्‍याची थंडी पडली; परंतु महिनाभरापासून स्वेटर्स, कानटोपी, मफलर, चादर यासाठी ग्राहकच नाहीत. त्यामुळे व्यपहार ठप्प झाला आहे. ज्या ग्राहकांकडे सुट्टे पैसे आहेत तेच ग्राहक खरेदी करीत आहेत. आमच्याकडेसुद्धा सुट्टे नसल्याने मर्यादा आली आहे.
- मंगेश करपे, कापड व्यापारी.

दोन हजारांच्या नोटेचे सुट्टे करताना दमछाक, 25 दिवसांनंतरही बाजारपेठेत मंदी

बीड - केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या निर्णयाला 25 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, नव्या चलनाचा तुटवडा आणि सुट्यांची वानवा यामुळे बाजारपेठेत अद्यापही मंदी आहे. दरम्यान, चिल्लर पैसेच मिळत नसल्याने नव्याने आलेली दोन हजारांची नोट नकोशी झाली आहे.

सुरवातीला बॅंकांमध्ये चलन बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. आताही बॅंक आणि एटीएमसमोर विड्रॉल करण्यासाठी रांगा कायम आहेत. एटीएममधून दिवसाकाठी केवळ अडीच हजार रुपये निघत आहेत. मात्र, बहुतांश एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटा नसल्याने ग्राहकांना फक्‍त दोन हजार रुपयांचीच नोट घ्यावी लागत आहे. दरम्यान, बाजारपेठेत दोन हजारांचे सुट्टे करताना दमछाक होत आहे. नोटाबंदीमुळे बाजारपेठेतील मंदी अजूनही कायम आहे. नागरिक मोठी खरेदी करण्याचे टाळत आहेत.

आवश्‍यक तेवढाच खर्च केला जात आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आपले हक्काचे पैसे काढण्यासाठी काहींना काम बंद ठेवून बॅंकेच्या दारात तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागत आहे; तर अनेकांचे व्यवहार खोळंबले आहेत.

सुटे द्या; अन्‌ माल घ्या
दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व्यापारी तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का, अशी विचारणा करीत आहेत. जर सुट्टे असतील तरच खरेदी करा, असेही ते सांगत आहेत. शिवाय पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याच्या सूचनादेखील अनेक दुकानांबाहेर लावलेल्या आहेत.

500 नवी नोट आली नाही
जिल्ह्यात अजूनही 500 ची नवी नोट आली नाही. दरम्यान, काही बॅंकांना 2000 च्या नोटांचा पुरवठा झाला. मात्र, त्यांचाही तुटवडा आहे. परिणामी, आर्थिक व्यवहार करताना नागरिकांची ओढाताण होत आहे.

Web Title: Newly ran wonders, two thousand unwanted currency