भरधाव वाहनाने चिरडल्याने तेरावर्षीय मुलगी जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

राष्ट्रीय महामार्गावरील घटना, संतप्त ग्रामस्थांनी रोखली वाहतूक 

येणेगूर (जि. उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडल्याने तेरावर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाळिंब (ता. उमरगा) येथील शिवाजीनगर तांड्याजवळ शुक्रवारी (ता. 15) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली होती. सहावीत शिक्षण घेणारी ही चिमुरडी कुटुंबीयांना कामात मदत करीत असे. तिचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा ठरला.

 हेही वाचा : " या ' निरीक्षकावर अपहाराचा गुन्हा 
पायल बाळू राठोड (वय 13, रा. शिवाजीनगर तांडा, ता. उमरगा) असे मृत मुलीचे नाव आहे. पायल दाळिंब येथील ज्ञानदीप विद्यालयात इयत्ता सहावीत शिक्षण घेत होती. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रातील पोलिस हेडकॉन्स्टेबल निवृत्ती बोळके, दिगंबर सूर्यवंशी, खलील शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री आठच्या सुमारास येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पायलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला.

हेही वाचा : तुम्ही दहावी पास आहात का ? तुम्हाला या क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी 

गावावर शोककळा

शनिवारी (ता. 16) सकाळी नऊच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक वाहनासह नळदुर्गच्या दिशेने पळून जाणाच्या प्रयत्नात होता. मात्र शिवाजीनगरच्या ग्रामस्थांनी जळकोट (ता. तुळजापूर) येथील एका हॉटेलवर त्याला पकडून येणेगूर दूरक्षेत्रातील पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मृत मुलीचे नातेवाईक सचिन पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about accident