शिर्डीच्या तीन विमानांचे औरंगाबादला इमरजन्सी लॅंडींग

अनिल जमधडे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

दृश्‍यमानतेमुळे फटका, प्रवाशी त्रस्त 

औरंगाबाद : शिर्डी परिसरातील हवामान खराब असल्यामुळे स्पाईस जेटच्या तीन विमानांनी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमरजन्सी लॅंडींग केले. तीनही विमानातील प्रवाशी मोटारीने शिर्डीकडे रवाना करण्यात आले. यामुळे प्रवाशी संतप्त झाले होते. 

शिर्डी विमानतळावर दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) नसल्याने विमानसेवेवर परिणाम झाला. या ठिकाणी उतरणारी स्पाईस जेटचे तीन विमाने औरंगाबादला उतरवण्यात आले. शिर्डी विमानतळावरील सेवा गुरुवारी (ता. 14) दिवसभर विस्कळित होती. 

शिर्डी विमानतळ परिसरात गुरुवारी सकाळपासूनच वातावरण खराब होते. त्यामुळे दिवसभरात येथून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही, तसेच विमानतळावर एकही विमान उतरविले नाही. येथे येणाऱ्या विमानांचे "लॅंडिंग' विविध ठिकाणच्या विमानतळावर करण्यात आले. त्यापैकी स्पाईस जेटचे चेन्नई, बेंगलोर आणि दिल्ली येथील शिर्डीसाठी आलेली तीन विमाने तातडीने औरंगाबाद विमानतळावर उतरवण्यात आली. शिर्डी विमानतळावर येणारे 14 विमाने रद्द करुन ती अन्यत्र विमानतळावर उतरवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले. विमानसेवा विस्कळित झाल्याने शिर्डीला येणाऱ्या, तसेच येथून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. स्पाईस जेटने औरंगाबादला उतरवलेल्या विमानातील प्रवाशांना मोटारीने शिर्डी पर्यंत प्रवास करावा लागल्याने प्रवाशांनी मनस्ताप व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about airport