GOOD NEWS : नाट्य संमेलनाचा लातुरात होणार जागर

सुशांत सांगवे
Friday, 31 January 2020

फिरत्या नाट्य संमेलनाचा मान मराठवाड्यातून लातूर शहराला मिळाला आहे. त्यामुळे लातूरात प्रथमच नाट्य संमेलनाचा जागर नाट्य रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

लातूर - अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यंदाचे शंभरावे वर्ष आहे. त्यामुळे कुठल्या तरी एका शहरात तीन दिवसांचे नाट्य संमेलन घेण्याऐवजी राज्याच्या वेगवेगळ्या भागात नाट्य संमेलन आयोजित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नाट्य परिषदेने घेतला आहे. या फिरत्या नाट्य संमेलनाचा मान मराठवाड्यातून लातूर शहराला मिळाला आहे. त्यामुळे लातूरात प्रथमच नाट्य संमेलनाचा जागर नाट्य रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक नुकतीच मुंबईत झाली. या बैठकीत शंभराव्या नाट्य संमेलनाची रुपरेषा ठरवण्यात आली. जागतिक रंगभूमी दिनी (२७ मार्च) सांगली येथे नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर १४ जून रोजी मुंबईत नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा होणार आहे. या दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागांत नाट्य संमेलन घेतले जाणार आहे. या यादीत मराठवाड्यातून सध्या लातूरच्या नावाचा समावेश परिषदेने केला आहे. मराठवाड्यातील अन्य शहरांतून निमंत्रण आले तर तेथेही नाट्य संमेलन घेतले जाईल, अशी माहिती परिषदेने ‘सकाळ’ला दिली.

परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम म्हणाले, मराठी नाटकांचा प्रेक्षक गावागावापर्यंत आहे. तिथवर मराठी नाटक पोचले पाहीजे, हा विचार घेऊन आम्ही यंदाचे नाट्य संमेलन राज्यभर साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील तीन दिवस वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग होतील. त्यानंतर पुढचे दोन दिवस स्थानिक नाट्य कलावंत, ज्येष्ठ नाट्य कलावंत यांचे नाट्य सादरिकरण, त्यांच्याशी गप्पा, पुण्या-मुंबईतील दिग्गज नाट्य कलावंतांच्या मुलाखती, नाट्य संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा उपस्थितांशी संवाद... अशी रुपरेषा फिरत्या नाट्य संमेलनाची असणार आहे. याला आम्ही ‘नाट्य जागर’ असे म्हणत आहोत. अशा प्रकारचा जागर लातूरातही केला जाईल. त्यासाठी लातूरातील नाट्य परिषदेच्या शाखेशी संपर्क साधला जाईल. शिवाय, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख हे लातूरचेच असल्यामुळे त्यांच्या समोरही हा प्रस्ताव नक्कीच ठेवला जाईल.
 
मराठीतील आद्य नाटककार व्यंकोजी राजे यांना २५ मार्च रोजी तंजावर येथे अभिवादन करून या संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. त्यासाठी नाट्य रथ तयार करण्याचा आमचा विचार आहे. हा रथ जिथे-जिथे संमेलन आहे. तिथे-तिथे तो पोहचेल, असेही त्यांनी सांगितले.
 

 लातूरमधील नाट्य शाखेने ९९व्या नाट्य संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. पण, त्यावेळी लातूरची निवड होऊ शकली नाही. आता शंभरावे नाट्य संमेलन राज्याच्या वेगवेगळ्या भागात होणार आहे. यासाठी आम्ही लातूरची निवड केली आहे.
- प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
 

 

 
शंभरावे नाट्य संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. यासाठी मराठवाड्यातून लातूरची निवड झाली असेल तर आम्हाला आनंदच आहे. हा सोहळा आम्ही दिमाखदारपणे साजरा करू.  
- शैलेश गोजमगुंडे अध्यक्ष, नाट्य परिषद (लातूर शाखा)
 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan