आपत्कालीन कक्षावरच आपत्ती, महिनाभरात मुख्यालयात नाही एकही तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

औरंगाबाद - आपत्ती व्यवस्थापनात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून, पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी 90 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी याच कर्मचाऱ्यांवर वॉर्ड कार्यालयांच्या कामाचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे एखाद्या भागात आपत्ती कोसळल्याचे संबंधित विभागाला 'मेसेज' देण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत केले जाते; मात्र गेल्या महिन्यात एकही तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आली नसल्याचे समोर आले आहे. अनेकांना कक्षाचा दूरध्वनी क्रमांकही माहीत नसल्याने आपत्ती व्यवस्थापन केवळ फार्सच ठरले आहे. 

पावसाळ्यात एखाद्या भागात पाणी तुंबले, पुरामुळे नाल्याचे पाणी घरात घुसले, झाड पडून दुर्घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्याचे शासनाचे महापालिकेला आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेने मुख्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. चार महिन्यांसाठी 90 कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे वॉर्ड कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्याच या कामासाठी नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. एका कर्मचाऱ्याला महिन्यातून एक दिवस आपत्ती व्यवस्थापन कक्षात एका शिफ्टमध्ये काम बंधनकारक करण्यात आले आहे. आपत्कालीन कक्षामार्फत तातडीने मदत मिळणे अपेक्षित आहे; मात्र येथील कर्मचारी फोनवरून आलेल्या तक्रारी घेऊन त्या संबंधित विभागाला कळविण्याचे एवढेच काम करतात; मात्र त्यांच्याकडे यंदाच्या पावसाळ्यात एकही तक्रार आली नसल्याचे महापौरांनी घेतलेल्या आढाव्यातून समोर आले. महापालिका मुख्यालयाचे दूरध्वनी क्रमांक आपत्कालीन कक्षासाठी देण्यात आले आहेत; मात्र नागरिकांना याबाबत माहिती नसल्यामुळे तक्रारी येत नसल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
  
वॉर्ड कार्यालयांवरील पथके कागदावरच 
वॉर्ड कार्यालयांनीसुद्धा आपत्ती व्यवस्थापनासाठी पथके तयार करावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार वॉर्ड अभियंता, स्वच्छता निरीक्षक, पाच मजुरांचा समावेश करून पथक तयार करण्याचे आदेश वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत; मात्र काही वॉर्ड कार्यालयांनी पथके तयार केली तर काहींनी अद्याप अशा पथकांची स्थापना केली सांगण्यात आले. 
 
अग्निशमन विभागाकडे 70 कॉल 
आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन विभाग सदैव तत्पर आहे. त्यामुळे सर्वाधिक ताणदेखील अग्निशमन विभागावरच आहे. मोठा पाऊस झाल्यास केवळ अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तारांबळ करून नागरिकांच्या मदतीसाठी धाव घ्यावी लागते. आतापर्यंत 70 कॉल आल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले. या विभागातही यंत्रणा, आवश्‍यक सामग्री, कर्मचारी अपुरे असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच असल्याचे चित्र आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about AMC Emergency room