AMC SMART BUS : जाताना पाच, येताना मोजा दहा रुपये!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

स्मार्ट बसमध्ये तिकिटात तफावत 

औरंगाबाद - स्मार्ट शहर बसमध्ये एकाच मार्गावर जाताना व येताना तिकिटामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जाताना पाच रुपये तिकीट असेल तर येताना प्रवाशाला त्याच मार्गासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे प्रवासी त्रस्त असून, हा प्रश्‍न सोडविण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (ता.11) शहर बससंदर्भातील अडचणी जाणून घेण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या. काही ठिकाणी प्रवाशांसोबत त्यांनी चर्चाही केली. यावेळी एकाच मार्गावर जाताना व येताना वेगवेगळ्या किमतीचे तिकीट दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. महावीर चौक ते रेल्वेस्टेशन या मार्गावर जाताना पाच रुपये तिकीट आहे. येताना मात्र दहा रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहेत. असाच प्रकार रेल्वेस्टेशन ते हर्सूल मार्गावर आहे. जाताना दहा रुपये तर येताना तब्बल 20 रुपयांचे तिकीट दिले जाते. त्यामुळे प्रवासी त्रस्त असून, प्रवाशांसोबतच वाहकांनी आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. 
 
तिकीट मशीनमध्ये गडबड 
शहर बस एसटी महामंडळामार्फत चालविण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडेच असलेल्या मशीन सध्या वापरल्या जात आहेत. या मशीनमध्ये गडबड असल्याने हा प्रकार होत असून, ही समस्या सोडविल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या मशीनबाबत बिघाड होणे, चार्जिंग उतरणे अशाही तक्रारी समोर येत आहेत. मशीनची कमतरता असल्याने वाहकांना अनेक वेळा ताटकळावे लागते. 
 
जनरल ड्युटीवर आक्षेप 
एसटी महामंडळामार्फत शहर बसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियोजन मात्र स्मार्ट सिटी परिवहन समितीमार्फत केले जाते. सर्वच कर्मचाऱ्यांना जनरल ड्युटी देण्यात आली आहे. त्यावरही चालक-वाहकांनी आक्षेप घेतला आहे. विशेषतः महिला वाहकांनी शिफ्ट मिळावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about AMC SMART BUS