औरंगाबादला येऊ शकतात पुन्हा हत्ती 

माधव इतबारे
मंगळवार, 16 जुलै 2019

सफारीपार्कमध्ये हत्तींसाठी स्वतंत्र जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे हत्तींच्या सफारीची मज्जा शहरवासीय घेऊ शकतात. 

औरंगाबाद - मिटमिटा भागात 100 एकर जागेवर विकसित करण्यात येणाऱ्या सफारीपार्कचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) अखेर मंगळवारी (ता. 16) सादर करण्यात आला आला. 145 कोटी रुपये खर्च करून आगामी दहा वर्षात सफारी पार्क विकसित केले जाणार असून, त्याची वाघ, सिंह, हत्तींसह सुमारे 500 प्राण्यांची क्षमता राहणार आहे. सफारीपार्कची 54 टक्के जागेवर हिरवळ असेल तर वर्षाला सुमारे 10 ते 20 लाख पर्यटक याठिकाणी भेटी देतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

सफारीपार्कमध्ये हत्तींसाठी स्वतंत्र जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे हत्तींच्या सफारीची मज्जा शहरवासीय घेऊ शकतात. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्राहालायाची जागा अपुरी असून, याठिकाणी चुकीच्या पद्धतीने पिंजऱ्यांची मांडणी करण्यात आली आहे, दाटीवाटीने प्राणी ठेवल्याचा ठपका सेंट्रल झू ऑथरेटीने ठेवला होता. महापालिकेने प्राणिसंग्रहालयात सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लान तयार केला मात्र तो कागदावरच राहिला. त्यामुळे गतवर्षी सेंट्रल झू ऑथरिटेने सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयाची परवाना रद्द केला होता.

महापालिकेच्या अपीलानंतर एका वर्षासाठी परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र सफारीपार्क विकसित करण्याची अटही त्यात टाकण्यात आली होती. दरम्यान महापालिकेने सफारीपार्कचा डीपीआर तयार करण्यासाठी दिल्ली येतील ब्रीजराज शर्मा यांच्या एजन्सीची नियुक्ती केली होती. या एजन्सीने मंगळवारी सादरीकरण केले. त्यात 500 प्राण्यांसह हत्तींसाठी देखील व्यवस्था करण्यात आली आहे. जागा उपलब्ध असेल तर हत्ती ठेवण्यास सेंट्रल झू ऑथरेटीची हरकत नाही. हत्तीवरून सफारी देखील करता येऊ शकते, असे सादरीकरणात सांगण्यात आले. प्राणिसंग्रहालयात असलेल्या सरस्वती व लक्ष्मी या हत्तींची जोडी सेंट्रल झू ऑथरेटीच्या आदेशाने महापालिकेने दोन वर्षांपूर्वी विशाखापट्टणम येथे नेऊन सोडली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about AMC's Siddhartha Garden Zoo museum