एटीएम मशीन चोरीचा कट पूर्वनियोजितच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

शहरातील एटीएम केंद्राचे तीन-तेरा वाजले आहेत. अशातच शहरातील बीड बायपासच्या यशवंतनगर येथे ऋतुपर्णा इमारतीत बसविण्यात आलेले एसबीआयचे एटीएम केंद्र चोरांनी पळविल्याचा अजब प्रकार शुक्रवारी (ता.12) मध्यरात्रीनंतर घडला.

औरंगाबाद - एटीएम मशीन चोरी केल्याचा कट पूर्वनियोजित होता. या आधीच त्या एटीएम केंद्रात चोरीसाठी रंगीत तालीम झाली, पाळतही ठेवण्यात आली होती. विशेषत: एटीएम मशीनची देखभाल, दुरुस्ती, अत्याधुनिक यंत्रणेची समज असणारे, मशीन स्थलांतर करणाऱ्या व्यवस्थेतील व्यक्तींचा हात यात असण्याची शक्‍यता तपासून पाहिली जात आहे. तसा संशयही पोलिसांना आहे. 

शहरातील एटीएम केंद्राचे तीन-तेरा वाजले आहेत. अशातच शहरातील बीड बायपासच्या यशवंतनगर येथे ऋतुपर्णा इमारतीत बसविण्यात आलेले एसबीआयचे एटीएम केंद्र चोरांनी पळविल्याचा अजब प्रकार शुक्रवारी (ता.12) मध्यरात्रीनंतर घडला. यात चोरांनी एटीएम मशीनसह 25 लाख रुपये लंपास केले. त्यामुळे शहरातील एटीएम मशीनबाबत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. या व्यवस्थेतील काहींचे एटीएम मशीन चोरीत हात असण्याची शक्‍यताही पोलिसांना वाटते. त्यामुळे या व्यवस्थेतील काहींची चौकशीही करण्यात येणार आहे.

खास करून तब्बल तीनवेळा चोरीचे प्रयत्न झालेल्या एटीएम केंद्रात चोरीचा कट प्री-प्लॅन होता. त्याची रंगीत तालीमही झाली होती. त्यातून दोन-तीन दिवस त्या एटीएम केंद्रात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या वेळासह इतर हालचालीही टिपल्या जात होत्या. सुरक्षारक्षक नसल्याने या एटीएम केंद्राची निवड गॅंगकडून झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली. 

पत्र देऊनही उपाययोजना नाही 
एटीएम मशीनची देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षेचे उपाय करणे अत्यंत आवश्‍यक होते. बीड बायपास येथील एटीएम मशीनमध्ये यापूर्वी तीनवेळा चोरीचा प्रयत्न झाला. ही बाब संबंधित यंत्रणेला माहीत होती. त्याबाबत पोलिस यंत्रणेने पत्रव्यवहारही केला होता. तरीही चोरीचे प्रयत्न होऊनही संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले. 

संशय, प्रश्‍न 

  • देखभाल दुरुस्तीसह एटीएम मशीन ट्रान्स्फर करणाऱ्या साखळीचा या चोरीत हात असण्याशी शक्‍यता. 
  • सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या व्यक्तींकडूनही मशीन पळविणाऱ्या गॅंगला मदत झाल्याचा पोलिसांना संशय. 
  • ज्या दिवशी मशीन पळविली, त्याच्या एक दिवस आधी मशीनमध्ये कॅश भरण्यात आली. ही बाब गॅंगला समजली कशी? 
  • पळविलेली मशीन काढणे सहज नव्हते. त्या बाजूच्या मशीनमध्ये कॅश कमी होती ही बाब गॅंग जाणून होती. ते सांगितले कुणी? 
  • सहज निघेल अशी मशीन सोडून दहा लाख कॅश जास्त असलेलीच मशीन पळविली यामागे संबंधित व्यवस्थेतील व्यक्तींचा सहभाग असू शकतो. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about ATM theft