औरंगाबाद : कंपनीचा कचरा उचलून महापालिकेला बिल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पी. गोपीनाथ रेड्डीचा प्रताप; गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

औरंगाबाद - शहरात घरोघरी जाऊन कचरा उचलण्याचे कंत्राट दिलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीची बोगसगिरी सोमवारी (ता. 16) स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. भाजप सदस्य राजू शिंदे यांनी कंपनीने चिकलठाणा येथील एका कंपनीचा कचरा उचलून महापालिकेला बिल दिल्याचे पुरावे बैठकीत सादर केले. त्यावर कंपनीला दहा टक्के दंड
आकारण्यात येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले; तर सभापतींनी कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. 

सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपचे राजू शिंदे, पूनम बमणे, गजानन बारवाल, सत्यभामा शिंदे, शिवसेनेच्या शिल्पा वाडकर, सीमा चक्रनारायण, सचिन खैरे, कमलाकर जगताप, एमआयएमचे नासेर सिद्दिकी, सायराबानो बेगम यांनी कंपनी कराराप्रमाणे काम करीत
नसल्याचा आरोप केला. महापालिकेचे सफाई कर्मचारी कंपनीला का दिले? त्यांचे वेतन कोण देणार? अनेक स्वच्छता निरीक्षकांनी कंपनीचे काम बरोबर नसल्याचे पत्र आयुक्तांना दिले आहे; मात्र कारवाई का केली जात नाही? असे प्रश्‍न सदस्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना केले. कंपनीच्या कामावर तुम्ही खूश आहात का? असा प्रश्‍न
शिंदे यांनी केला. त्यावर भोंबे यांनी होकार देताच कंपनीचे काम कसे बोगसपणे सुरू आहे, याचे पुरावेच शिंदे यांनी सादर केले. चिकलठाणा एमआयडीसीतून कंपन्यांचा कचरा उचलून महापालिकेकडून बिल घेतले जात आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? असे सांगत शिंदे यांनी गरवारे आणि लुपिन कंपनीच्या नावाचाही उल्लेख करीत कंपन्यांतील कचरा उचलला जात
असल्याचे छायाचित्र बैठकीत सादर केले. त्यावर घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी त्या भागातील सुपरवायझरकडून चौकशी अहवाल मागवून कंपनीला एका महिन्याच्या बिलातून दहा टक्के दंड आकारला जाईल, असे सांगत कंपनीची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र शिंदे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार सभापती जयश्री कुलकर्णी
यांनी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 
  
...अन्यथा कचरा महापालिकेत टाकू 
जकात नाका परिसरात गेल्या दीड वर्षापासून पडून असलेला कचरा तातडीने उचला; अन्यथा तो महापालिकेत आणून टाकू, असा इशारा नासेर सिद्दिकी यांनी दिला. सध्या या ठिकाणी दीड हजार टन कचरा पडून असून, तो उचलण्याचे काम आजपासून सुरू केले जाईल, असे आश्‍वासन दिले. सचिन खैरे यांनीही बेगमपुरा स्मशानभूमीतील कचरा उचला अथवा आंदोलन
छेडले जाईल, असा इशारा दिला. 
 
फोन उचलण्यासाठी कर्मचारी द्यायचा का? 
कचऱ्यासंदर्भातील तक्रारींसाठी घनकचरा प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना फोन केला असता ते फोन घेत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली. त्यावर श्री. शिंदे यांनी तुम्ही खूपच काम करणारे अधिकारी आहात, पाहिजे तर तुम्हाला फोन उचलण्यासाठी एक कर्मचारी देतो, अशा शब्दांत टोला लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Aurangabad garbage problem