औरंगाबाद : चार शासकीय रुग्णालयांची  क्षमता होणार दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

तीस खाटांच्या बिडकीन (ता. पैठण), पिशोर (ता. कन्नड) ग्राणीण रुग्णालयांना पन्नास खाटांचे करावे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता पन्नासवरून शंभर करा; तसेच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करून शंभर खाटांची क्षमता करावी, असा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्यविभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला. 

औरंगाबाद - तीस खाटांच्या बिडकीन (ता. पैठण), पिशोर (ता. कन्नड) ग्राणीण रुग्णालयांना पन्नास खाटांचे करावे. सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता पन्नासवरून शंभर करा; तसेच सोयगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय करून शंभर खाटांची क्षमता करावी, असा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्यविभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला. 

ग्रामीण भागातील रुग्णालयांची क्षमता वाढविण्यावर भर असल्याचे आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांनी डिसेंबरअखेर जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिलेल्या भेटीत स्पष्ट केले होते.त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील ग्रामीणसह उपजिल्हा रुग्णालयाचे फेरप्रस्ताव आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्याकडे सादर केले. डॉ.लाळे यांच्या प्रस्तावाला आरोग्य सेवा संचालनालयाने जानेवारीत हिरवा कंदील दाखवीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सविस्तर अहवाल सादर केला. गेल्या बजेटमध्ये या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसला तरी आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. 

वैद्यकीय खर्च कमी करण्यावर भर 
नागरिकांचा वैद्यकीय खर्च कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणेचे रुग्णालयांची क्षमता वाढ व कार्यात वाढीसाठी प्रयत्न सुरू असून, जिल्ह्यातील पाच रुग्णालयांचे प्रस्ताव मंत्रालयात पोचले असल्याचे प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माळे यांनी सांगितले. श्रेणीवर्धनामुळे वाढीव मनुष्यबळ मिळाल्याने आरोग्यसेवेचे बळकटीकरण होईल, असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 
 
सोयगावात उपजिल्हा रुग्णालयाची मागणी 
सोयगावत ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय करण्याची मागणी आहे. या रुग्णालयासाठी प्रस्तावात 100 खाटांसाठी 49.31 कोटींची मागणी करण्यात आलेली आहे. 
 
सिल्लोड 
सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयांची सध्याची पन्नास खाटांची क्षमता वाढवून दुप्पट करण्याची मागणी तेथील स्थानिकांनी केली होती. त्यानुसार 2.53 कोटींची मागणी प्रस्तावात करण्यात
आली आहे. 
 
बिडकीन-पिशोर 
बिडकीन व पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयांची क्षमता तीसवरून पन्नास करण्याची मागणी लोकसंख्येनुसार करण्यात आली आहे. त्यासाठी अनुक्रमे 6.25 कोटी व 6.71 कोटींची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. 
 
अशी वाढणार खाटांची संख्या 

  • सिल्लोड 50 वरून 100 
  • सोयगाव 30 वरून 100 
  • पिशोर 30 वरून 50 
  • बिडकीन 30 वरून 50 
Web Title: News about Aurangabad Sub District Hospital