बॅंक प्रशासन हाय हाय...

प्रकाश बनकर
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

टर्मिनेशन नोटिसा रद्द कराव्या, महिला अधिकाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या रद्द कराव्यात व कामाचे तास नियमित असावेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी कुठलेही कामकाज देऊ नये ही मागणी ट्‌विन बॅंकरतर्फे करण्यात आली

औरंगाबाद: बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे अधिकाऱ्यांना टर्मिनेशनच्या नोटिसा दिल्या आहेत. यासह बॅंकांची सुरक्षा हटविली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. या विरोधात बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, ट्‌विन बॅनरतर्फे शुक्रवारी (ता.20) झोनल कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

औरंगाबादेत झोनल कार्यालयासमोर सकाळी 11 ते दुपारी चारपर्यंत धरणे आंदोलन करीत बॅंक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात विविध शाखेचे शंभरहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे जनरल सेक्रेटरी कैलास कानडे, वरिष्ठ मोकाशी, स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे माजी जनरल सेक्रेटरी जगदीश भावठाणकर, एआयबीईएचे जॉइंट सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखली हे धरणे आंदोलन करण्यात आले. श्री. तुळजापूरकर म्हणाले, की पुरेशी कर्मचारी भरती करावी, पाचशे शाखांमधून पीटीएस हंगामी आहेत. साडेतीनशे शाखांमधून सब स्टाफ नाहीत तरी येथे भरती होणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

टर्मिनेशन नोटिसा रद्द कराव्या, महिला अधिकाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या रद्द कराव्यात व कामाचे तास नियमित असावेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी कुठलेही कामकाज देऊ नये ही मागणी ट्‌विन बॅंकरतर्फे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल व्यावसायिक जी.जी.वाकडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राजेंद्र देवळे, विजय गायकवाड, अजय केंद्रे, राजेंद्र मुंगीकर, उत्तम भाकरे, श्री.बीडकर, मणिंदर कांसा, महेश बोरुडे, वृंदा कुलकर्णी, मोना चौधरी, शीला खरात आदींचा सहभाग होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about bank of Maharashtra