शहरासाठी सोळाशे कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी देणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

मराठवाड्याची दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी 64 हजार किलोमीटरच्या ग्रीडच्या माध्यमातून जलवाहिनी टाकणार आहोत. यासाठी वीस हजार कोटींच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली असून, औरंगाबाद व जालन्याचे टेंडरही निघाले आहे.

औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळी भाग आहे, सततचा दुष्काळ किती दिवस सहन करणार? वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ संपवून इथल्या सर्वसामान्यांची तहान भागवणार आहे. पुढील पिढीस दुष्काळ पाहू देणार नाही, असे सांगत औरंगाबादचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सोळाशे कोटींच्या नवीन योजनेला मंजुरी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.27) दिली. 

"महाजनादेश यात्रा' मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभेत ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे, सुरजितसिंह ठाकूर, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, डॉ. भागवत कराड, संजय केणेकर, शिरीष बोराळकर, किशनचंद तनवाणी, एकनाथ जाधव, अनिल मकरिये, खासदार सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मराठवाड्याची दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी 64 हजार किलोमीटरच्या ग्रीडच्या माध्यमातून जलवाहिनी टाकणार आहोत. यासाठी वीस हजार कोटींच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली असून, औरंगाबाद व जालन्याचे टेंडरही निघाले आहे. तसेच गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढत कोकणातील पावसाचे पाणी बोगद्याच्या माध्यमातून वळविण्याची योजना राबवीत आहोत. यातून 167 टीएमसी पाणी मिळेल. हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यातून दिले जाणार आहे. 

दोन शहरे मॅग्नेट 

औरंगाबादेतील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. डीएमआयसी, ऑरिक सिटी, समृद्धी महामार्गामुळे भविष्यात औरंगाबाद आणि जालना ही दोन शहरे उद्योगांसाठी मॅग्नेट ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीमुक्‍त महाराष्ट्र होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांच्यासह इतर पक्षातील काही नेते, कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. 

विरोधक हरले तरीही सुधरले नाहीत 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रांना लोकच नसल्याने त्या मंगल कार्यालयात भरवाव्या लागत आहेत. पंधरा वर्षे राज्यात सत्ता असताना विरोधकांना जनतेचा विसर पडला. मुजोरी केल्यामुळेच जनतेने त्यांना घरचा रस्ता दाखवला. वर्ष 2014 नंतर केंद्रात त्यांचा विरोधी पक्षनेता नाही. महाराष्ट्रात देखील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल एवढे आमदार निवडून येणार नाहीत. हरले तरी सुधरले नाहीत, जनतेत जात नाही, त्यांची माफी मागत नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मोदी 

दहा वर्षे राज्यात पार्लमेंट ते पंचायतमध्ये विरोधकांची सत्ता होती. तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या, तिथे ईव्हीएम चांगले आणि जालन्यात रावसाहेब दानवे विजयी झाले तर तिथे ईव्हीएम खराब कसे? असा सवाल करतानाच ईव्हीएमचा अर्थ एव्हरी वोट फॉर मोदी असा आहे आणि तो जनतेनेच ठरवला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about BJP maha janadesh yatra