मुलांना नकार पचवायला शिकवा, तज्ज्ञांचे मत

योगेश पायघन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

तात्कालिक कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात कुत्रा पाळायला विरोध केल्याने सिडकोतील सर्वेश शाहू (वय 11) या सातवीतील विद्यार्थ्याने गळफास घेतला. त्यामुळे मुलांना नकार पचवायला शिकविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

औरंगाबाद - तात्कालिक कारणांवरून मुलांनी टोकाचे पाऊल उचलून जीव गमावल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. घरात कुत्रा पाळायला विरोध केल्याने सिडकोतील सर्वेश शाहू (वय 11) या सातवीतील विद्यार्थ्याने गळफास घेतला. त्यामुळे मुलांना नकार पचवायला शिकविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

याविषयी "सकाळ'ने बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष महेंद्रवार यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, की मुलांची सध्याची पिढी जनरेशन नेक्‍स्ट आहे. पालकांचे विचार त्यांच्यासोबत जुळतीलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांशी विचार मिळवून निर्णय घेणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना त्याचे फायदे-तोटे त्या मुलांना समजावून सांगणेही तितकेच आवश्‍यक आहे.

सध्याच्या पिढीत संयम फार कमी आहे. लहानपणापासून प्रत्येक हट्ट पुरवताना त्यांना नकार पचवायला शिकवायचे राहून जाते. त्यामुळे पालकांनी मुलांना नकार पचवणे शिकविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी मारण्याचा व रागावण्याचा पर्याय निवडला तर ते भावनाशून्यतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे मुलांचे संगोपन शिकण्याची वेळ पालकांवर आली आहे. 
 

मुलांना "नाही' ऐकून घ्यायची सवय उरलेली नाही. तात्कालिक कारणाने झाले असे म्हणता येणार नाही. ते हट्टी आधीपासून असतात. त्यांच्या त्या लक्षणांकडे दुर्लक्ष होता कामा नये. मुलांना सोशल मीडिया, समाजातून काय इनपुट मिळताहेत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांशी मित्र म्हणून संबंध ठेवले पाहिजेत. एका घटनेने आत्महत्या केली असे नसते. मूल जर गरजेपेक्षा जास्त हट्टी आहे हे लक्षात आल्यावर त्याचे समुपदेशन, समजूत काढणे आणि आवश्‍यकता भासल्यास तज्ज्ञांना दाखवले पाहिजे. पूर्वी मुले हट्टासाठी रडपड करायची. मात्र, हट्ट पूर्ण न झाल्यावर काय करायचे हे कुठून तरी ते शिकत आहेत. ते काय माध्यम आहे, त्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्या संस्कारांवरही भर द्यावा.'' 
- डॉ. मकरंद कांजाळकर, न्युरोफिजिशियन 
 
छोट्या - छोट्या कारणांवरून मुलांत वर्तणूक व भावनिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कमीपणा, अपराधीपणाची भावना निर्माण होत असते. अशी मुले अतिसंवेदनशील तर स्वभाव अधिकाधिक लहरी होत जातो. या सगळ्यांतून बाहेर पडण्यासाठी ते सुटकेचा मार्ग शोधत असतात. या काळात त्यांच्याशी पालकांचा असलेला संवाद, नाते यावरून ते ठरते. मुलगा सध्या कोणत्या वातावरणात जगतोय. तो तुलनात्मकता कशी करतोय याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सध्या आत्महत्येवरील गेम्स, टीव्ही सिरियल, वेबसिरीजचा मुलांवर परिणामही पडल्याचे जाणवत आहे. मुले आजुबाजुला बघून शिकतात. निराशा, मरगळ, कमीपणा, संवेदनशीलता यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात. त्यामुळे मुले स्ट्रेसफूल प्रसंगात कसे वागतात अन्‌ कसे बाहेर पडतात, हे पालकांनी पाहिले पाहिजे. तसेच सुसाईडच्या एक्‍स्पोझरपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे.'' 
- डॉ. प्रदीप देशमुख, मनोविकृशास्त्र विभागप्रमुख, घाटी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Children's Counseling