उमरगा (जि. उस्मानाबाद) : गांधी अर्जुन मंडले खूनप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांवर रविवारी (ता. 19) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (ता. 20) संशयित आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 23) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मृताच्या भावाने व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे. क्रूरपणे केलेल्या खुनामागे नेमके कारण कोणते, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होणार आहे.
हेही वाचा - सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका
शहरातील बिरुदेव मंदिर परिसरातील शेतात गांधी अर्जुन मंडले (वय 40, रा. भुसणीवाडी) यांचा मृतदेह बुधवारी (ता. 15) दुपारी आढळला होता. तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा निर्घूण खून केल्याचे उघडकीस आले. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक माधव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता. गांधी मंडले यांचा मोबाईल क्रमांक बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यानंतर आरोपींनी खून करून त्यांच्याजवळील मोबाईल गायब केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्यानंतर तपासाची चक्रे हलली.
वरिष्ठ अधिकाऱ्यासह गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी विविध पथकांच्या साह्याने कासारशिरसीवाडी (ता. निलंगा) तसेच कर्नाटकातील बसवकल्याण, आळंद तालुक्यांत पोलिसांनी शोध घेऊन संशयितांना ताब्यात घेतले.
मानतेश अर्जुन मंडले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष बाबूराव ईश्वरे (वय 35, रा. कासारशिरसीवाडी, ता. निलंगा), धरणाम्मा सुंदरप्पा नगरेड (40, रा. खंडाळा, ता. बसवकल्याण), संजय रंगराव भोसले (38, रा. मुगळेवाडी, ता. बसवकल्याण), भास्कर पांडुरंग भोसले (31, रा. घोटाळ, ता. बसवकल्याण), लक्ष्मण रंगाण्णा मंडले (20, रा. खंडाळा, ता. आळंद) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संशयितांना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गांधी मंडले खून प्रकरणात फिर्यादीच्या संशयावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी खून झालेल्या दिवशी गांधी सोबत होते. त्यांचे मोबाईलवर एकमेकांशी संभाषण झाले होते. तपासात नेमके कारण समोर येईल.
- सिद्धेश्वर गोरे, सहायक पोलिस निरीक्षक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.