भूम तालुक्‍यातील 30 गावांत टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पाच चारा छावण्यांसह हाडोंग्री येथे गोशाळा 

भूम (जि.उस्मानाबाद) : पावसाअभावी तालुक्‍यात पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामाची चिंता वाढली आहे. पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला तरी दमदार पाऊस न झाल्याने तालुक्‍यातील 30 गावांना 32 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या पावसाळ्यातही तालुक्‍यात पाच चारा छावण्यांसह हाडोंग्री येथे एक गोशाळा व छावणी सुरू आहे. उन्हाळ्यात तालुक्‍यात तब्बल 50 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. 

तालुक्‍यात जूनपासून आतापर्यंत केवळ 386.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्‍यातील सर्वच 14 प्रकल्प कोरडे आहेत. ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी अधिग्रहण केले तरी पाणीपातळी कमी होत असल्याने मोठी आडचण येत आहे. 12 ठिकाणी अधिग्रहण करून 30 गावांना 32 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी शासनाने एक कोटी रुपये जवळपास पाण्यावर खर्च केले आहेत. तालुक्‍यातील सर्वच प्रकल्प भरण्यासाठी आता परतीच्या पावसावर मदार आहे. येत्या आठभरात दमदार पाऊस अपेक्षित आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाई भासणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्पात मृतसाठा असून, लवकरच अन्य ठिकाणांहून पाण्याची सोय न झाल्यास शहरवासीयांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तालुक्‍यातील गिरवली, वालवड, सोन्नेवाडी, सावरगाव (दे.), पाटसांगवी, अंबी, हिवर्डा, चुंबळी, गोलेगाव, अंतरगाव, इडापिडा, वाल्हा, आष्टावाडी, दांडेगाव, चिंचपुरढगे, भवाणवाडी, शेकापूर लाजेश्वर, अंजनसोंडा, झेंडेवाडी, गोसावीवाडी, आरसोली, जोतिबावाडी, नागेवाडी, राळेसांगवी, आंद्रुड, जेजला, सावरगाव (पा.), साडेसांगवी, बेदरवाडी येथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गोलेगाव व जेजला येथे पाणीटंचाई असल्याने ग्रामपंचायतीकडून अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Drought