सत्ता मिळवणे म्हणजे अच्छे दिन का? स.भु. करंडकमध्ये विद्यार्थ्यांचा रोष

अतुल पाटील
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

सहमती-असहमतीची मुभा आहेच
लोकशाहीने सरकारच्या निर्णयात सहमती-असहमतीची मुभा दिली आहे. बुद्धिजीवी लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देश हुकूमशाहीकडे वाटचाल करेल, असे वाटत नाही. मतदारांकडे नोटासारखे हत्यार आहे. बहुपक्षीय पद्धतीचा देश आहे. तसेच देशात एवढीच एकाधिकारशाही असती तर, स्पर्धेतील विषयावर अनुकुल बाजुच्या लोकांना इथेही बोलता आले नसते. नोटबंदी सांगून केल्यास काळा पैशाला आळा कसा बसेल. चांगल्या गोष्टीला खोडा घालत असेल तर, यातूनच एकाधिकारशाही तयार होईल. अशी भीतीही प्रतिकुल बाबी मांडताना केली.

औरंगाबाद : "अच्छे दिन आने वाले है' चे नारे देत निवडणुक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी "अच्छे दिन आले!' असे राज्यकर्ते म्हणत असतील तर, सत्ता मिळवणे म्हणजेच अच्छे दिन का? असा प्रश्‍न एका विद्यार्थिनीने उपस्थित केला. ती "स.भु. करंडक - 2019' या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत "एकपक्षीय बहुमत एकाधिकारशाहीकडे नेते' या विषयावर बोलत होती.

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात 19 आणि 20 सप्टेंबरला ही स्पर्धा होत आहे. पहिल्या दिवशी दहा महाविद्यालयांच्या संघांच्या 20 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. अनुकुल आणि प्रतिकुल मांडणी झाली. स्पर्धेच्या विषयावर अनुकुल मांडणी करताना पुलवामा हल्ल्याचा विषय भावनिक करुन बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्याचा प्रकार सत्ताधारी पक्ष करत आहे. 370 कलम हटविताना लोकशाही मार्गाचा अवलंब केला का? भुतकाळातील कथित भ्रष्टाचार उकरत त्यांना ईडीची भीती दाखवली जात आहे. सत्तेत आतापर्यंत कधीच कट्टर डावे किंवा उजवे न बसल्याने लोकशाही टिकली होती. सबका साथ सबका विकास असे म्हणताना अल्पसंख्याक जाती समुहावर हल्ले का होत आहेत? नोटांच्या विमुद्रीकरणाचा निर्णय गर्व्हनर सांगत नसेल? सर्जिकल स्ट्राईकबाबत अधिकृत माहिती सुरवातीला लष्करप्रमुख देत नसतील? वंदे मातरम! भारत माता कि जय! यावरुन देशभक्‍ती ठरवली जात असेल तर, ही हुकूमशाही नाही का? भौतिक विकासापेक्षा सामाजिक विकास हवा आहे. त्यामुळेच भारताचा चीन झालेला आम्हाला आवडणार नाही. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या पुजा मोरे हिची मुस्कटदाबी केली जाते. ही हुकूमशाहीच आहे. असे मत अनुकुल स्पर्धकांनी नोंदविले. सुत्रसंचालन शितल संपकाळ, ऋषिकेश साळुंके यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण संदीप काळे, संजय शिंदे, दीक्षा इंगळे करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Education