वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्‍न निकाली

अनिल जमधडे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

खंडपीठाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाची दखल 
 

औरंगाबाद, : वस्तीशाळा शिक्षकांच्या वेतन निश्‍चितीचा प्रश्‍न खंडपीठाच्या आदेशानंतर मार्गी लागला आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वेतननिश्‍चितीच्या संदर्भात सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठववून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

राज्यातील वस्तीशाळा योजना बंद करुन वस्तीशाळेवरील शिक्षकांना कायमस्वरुपी जिल्हा परिषद शाळेत सामावून घेण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील वस्तीशाळा शिक्षकांना चुकीची वेतन निश्‍चिती करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांनी अनेक वेळा निवेदने देऊनही कार्यवाही झाली नाही.

या शिक्षकांना प्रत्यक्षात 2160 रुपये कमी दिले जात होते. त्यामुळे बीडकीन (ता. पैठण) येथील रऊफ पटेल व अन्य वीस शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले. त्यानंतरही सुधारीत वेतनश्रेणी मिळत नसल्याने लाडसावंगी येथील गणेश शिंदे यांच्यासह फुलंब्री, पैठण, वैजापूर, कन्नड तालुक्‍यातील 48 शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावेळी खंडपीठाने 4 डिसेंबर 2018 शिक्षकांची वेतनश्रेणी दुरुस्तीबाबत सहा महिन्यात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. अखेर खंडपीठाच्या त्या आदेशाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शिक्षकांची नियमीत वेतनश्रेणी किमान टप्प्यावर देण्यात यावी यासाठी योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about education