सांगलीत पुरात अडकलेल्या 227 नागरिकांना काढले सुखरूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

गील आठवड्यात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या भागात महापूर आलेला होता. या ठिकाणी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साहित्यांसह दोन बोटी आणि 12 जणांचे पथक सांगलीला रवाना झाले होते. या पथकाने सांगली येथे दोन दिवसांत पुरात अडकलेल्या 227 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले; तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे वितरणाची जबाबदारीही चोखपणे पार पाडली आहे. यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अग्निशमन अधिकारी विशाल आल्टे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त भागात बचाव कामात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल सर्व बचाव पथकातील सदस्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

लातूरः मागील आठवड्यात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने या भागात महापूर आलेला होता. या ठिकाणी लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साहित्यांसह दोन बोटी आणि 12 जणांचे पथक सांगलीला रवाना झाले होते. या पथकाने सांगली येथे दोन दिवसांत पुरात अडकलेल्या 227 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले; तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना अन्नाची पाकिटे वितरणाची जबाबदारीही चोखपणे पार पाडली आहे.

यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अग्निशमन अधिकारी विशाल आल्टे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त भागात बचाव कामात उत्कृष्ट कामगिरी बजाविल्याबद्दल सर्व बचाव पथकातील सदस्यांना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

लातूरमध्ये दुष्काळ असताना 2016 मध्ये सांगलीकरांनी लातूरकरांना रेल्वेने पाणीपुरवठा केला होता. आपल्या अडचणीच्या काळात सांगलीकरांनी मैत्री धर्म निभावून लातूरला वेळेत पाणी उपलब्ध करून दिले होते. त्याच सांगलीकरांच्या या अडचणीच्या काळात लातूर जिल्हावासीयांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करून सांगली शहरातील सुमारे 227 लोकांना पुरातून बाहेर काढले. सांगलीकर मित्रांच्या मदतीला वेळेत पोहोचून लातूरकरांनी मैत्री धर्म चोखपणे निभावला. 

बचाव पथकातील या 12 जिगरबाज सदस्यांचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अभिनंदन केले. महापुराच्या अवघड परिस्थितीमध्ये अत्यंत धैर्याने चांगले काम या बचाव पथकाने केले आहे. या कामाचा व तेथील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव आला असून, इतर ठिकाणी गरज पडल्यास अशावेळी आपण सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी बचाव पथकाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी आल्टे आणि महादेव पानपट्टे यांनी पूरग्रस्त भागात बचावात बजाविलेल्या कामगिरीचे अनुभव कथन केले. लातूरचे बचाव पथक कोणत्याही आपत्तीमध्ये काम करण्यास सदैव तत्पर असेल अशी ग्वाही दिली. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पोलिस उपअधीक्षक मधुकर जवळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांच्यासह इतर विभागप्रमुख उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about flood