रोजगाराचे आमिष दाखवून फसवणूक

ढोकी (ता. उस्मानाबाद) : तक्रारी देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिला.
ढोकी (ता. उस्मानाबाद) : तक्रारी देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या महिला.

ढोकी (जि. उस्मानाबाद) : घरबसल्या पिशव्या शिवण्याचा रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो महिलांकडून किमान पाचशे ते एक हजार रुपये अनामत रक्कम घेऊन एका भामट्याने पलायन केले. ही रक्कम सुमारे दहा लाखांच्या घरात आहे. या भामट्याकडून फसगत झाल्याचे लक्षात येताच त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यासाठी महिला व पुरुषांनी बुधवारी (ता. 22) आणि गुरुवारी (ता. 23) येथील पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. 

मेडिकल, बाजारपेठेतील दुकानांत लागणाऱ्या पिशव्या शिवून देण्याचा रोजगार देण्यासाठी एका भामट्याने अनेक महिलांकडून पाचशे ते एक हजार रुपये अनामत रक्कम जमा केली. ढोकीसह परिसरातील 10 ते 12 गावांतील हजारो महिलांनी घरबसल्या रोजगार मिळत असल्याने त्याच्याकडे अनामत रक्कम दिली आहे. मात्र मंगळवारी (ता. 21) रात्रीच्या सुमारास हा भामटा फरारी झाला. येथील ग्रामपंचायतीने गेल्या आठवड्यात संक्रांत महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये एका व्यक्तीने स्टॉल लावला होता. यात त्याने पत्रक छापून महिलांना शिलाईचे काम घरी मिळेल, ऑफिस कामासाठी मुले पाहिजेत, अशी जाहिरात केली.

हे पत्रक त्याने महोत्सवात व येथील बाजारात वाटप केले. हे पत्रक वाचून ढोकी परिसरातील गोवर्धनवाडी, तेर, कसबे तडवळे, वाखरवाडी, रुई, तुगाव, कावळेवाडी, गोरेवाडी, कोल्हेगाव, माळकरंजा, ढोराळा आदी गावांतील जवळपास अडीच हजार महिलांनी त्याच्याकडे अनामत रक्कम दिली. शंभर मोठ्या पिशव्या कटिंग करून देण्यासाठी काही महिलांकडून एक हजार, तर काहींकडून पाचशे रुपये अनामत या भामट्याने घेतली. येथील बालाजीनगरमधील एका घरात दुकानही थाटले.

शंभर मोठ्या पिशव्यांना शंभर रुपये मजुरी, तर लहान पिशव्या शिवून घरी आणून देण्यास दीडशे रुपये मजुरीप्रमाणे एक आठवडाभर या भामट्याने महिलांना पैसे दिले. शिवाय पिशव्या तयार करण्यासाठी 10 मीटर कपडा अनामत रक्कम दिलेल्या महिलांना घरपोच दिला. शिलाई केलेल्या पिशव्या गोळा करण्याचे काम काही मुलांकडून करण्यात आले. अशा सहा ते सात मुलांना दरमहा नऊ हजार रुपये मजुरी देण्याचे त्याने ठरवले होते. एक आठवडाभर त्याने रोजगार दिला. यासाठी त्याने जवळपास 10 लाख रुपये अनामत रक्कम जमा केली. त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पंचायत समितीचे सदस्य संग्राम देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दगडू धावारे, दत्ता साळुंके, संतोष कंदले, शाकेर वस्ताद यांनी मंगळवारी बालाजीनगरमधील या भामट्याच्या दुकानाला भेट दिली.

गावातील महिलांना तुम्ही काम दिले हे चांगले झाले. या सर्व महिलांचे 10 हजार रुपये अनामत मी स्वतः भरतो. कोणत्याही महिलेने आपले पैसे किंवा माल बुडवला तर त्याचे पैसे मी देतो, असे त्याला संग्राम देशमुख यांनी सांगितले. लोक जागृत झाल्याची जाणीव झाल्याचे भामट्याच्या लक्षात आले व त्याच रात्री त्याने ढोकीतून पलायन केले. बुधवारी सकाळी त्याच्या दुकानात गेल्यानंतर महिलांना तो तेथून निघून गेल्याचे समजले. आपली फसगत झाल्याचे लक्षात घेताच बुधवारी काही महिलांनी पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली. त्यानंतर ग्रामपंचायतीने पोलिस ठाण्याच्या सूचनेनुसार बालाजीनगरमधील या भामट्याच्या दुकानाला सील ठोकल्याची माहिती उपसरपंच अमोल समुद्रे यांनी दिली. 

बुधवारी 43, तर गुरुवारी 128 महिला-पुरुषांनी या भामट्याने फसवणूक केल्याच्या तक्रारी येथील पोलिस ठाण्यात दिल्या आहेत. प्राप्त तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदर भामट्याचे नाव शंकर केंद्रे असे असून, तो अहमदपूरचा रहिवासी असल्याचे सांगून परिसरात वावरत होता. 
- श्री. बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com