विसर्जनासाठी तयार केला कृत्रिम तलाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

धरण, तलाव कोरडेच; उमरगा पोलिस प्रशासन सज्ज 

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शहरासह 73 गावांत 184 ठिकाणी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर, 20 गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी (ता. नऊ) एकुरगा येथील एक गाव एक गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाले. तर, गुरुवारी (ता. 12) 183 गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे होण्यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, शहरासह ग्रामीण भागातील धरण, तलाव कोरडे असल्याने शहरातील श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिकेने कृत्रिम तलाव तयार केला आहे.

उमरगा पोलिस ठाण्याअंतर्गत 20 गावांत एक गाव-एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. शहरात 42, तर ग्रामीण भागात 142 अशा 184 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. गुरुवारी होणारी विसर्जन मिरवणूक शांततेत होण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी राष्ट्रीय महामार्गावर होणारी कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

गेल्या चार-पाच वर्षांपासून शहर व ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पालिकेने श्रींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र अशी कृत्रिम तलावाची उपाययोजना गेल्या सहा वर्षांपासून सुरू केली आहे. यंदाही परिसरातील तलाव कोरडे असल्याने आरोग्यनगरीच्या मार्गाने भारत विद्यालयाच्या पाठीमागे कृत्रिम तलाव तयार केला आहे. शहरातील लहान व मध्यम आकार व उंचीच्या श्रींच्या मूर्तीचे या ठिकाणी विसर्जन केले जाणार आहे. नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, आरोग्य निरीक्षक एम. आर. शेख यांच्यासह पालिका सदस्यांनी या कामाचे नियोजन केले आहे. 

शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. गतवर्षीच्या मुरूम घोटाळ्याचे प्रकरण अजून संपलेले नाही. तर, यंदा मुरूम टाकण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया उशिरा झाली. निविदा आठ दिवसांपूर्वी उघडण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतर कार्यरंभ आदेश देण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मुरूम टाकण्याचा ठेका घेण्यासाठी पालिका सदस्यांत सुरू असलेल्या अंतर्गत कूरघोडीने विसर्जन मिरवणूक मार्गावर खडक टाकण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे यंदा गणरायाला रस्त्यावरील खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. 
 

 

शांततेत गणेश विसर्जनाची परंपरा कायम ठेवण्यात उमरगेकरांचा आदर्श आहे. यंदाही अशीच आदर्श परंपरा जपली जावी. डीजेला परवानगी नसल्याने गणेश मंडळांनी डीजेला फाटा द्यावा. पारंपरिक वाद्यांचा समावेश करून श्रींचे विसर्जन वेळेत करण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. मिरवणूक शांततेत होण्यासाठी पोलिस विभाग सतर्क असून, सर्व गणेशभक्तांनी शांततेत मिरवणुका होण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. 
- सुरेश चाटे, पोलिस निरीक्षक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Ganesh Festival