चिकलठाण्याच्या प्रक्रिया प्रकल्पासाठी जून उजाडणार 

औरंगाबाद ः चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर ठेकेदाराने अशा मशिन लावल्या आहेत.
औरंगाबाद ः चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर ठेकेदाराने अशा मशिन लावल्या आहेत.

औरंगाबाद - शहराच्या ऐतिहासिक कचराकोंडीतून बोध घेऊन औरंगाबादचे इंदूर करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. वर्षभरानंतरही इंदूर "दूर'च राहिले असून, शहरवासीयांना अद्याप कचऱ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असले, तरी जून महिन्यापूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो, असे शुक्रवारी (ता. 15) तांत्रिक विभाग कक्षप्रमुख एम. बी. काझी यांनी आढावा बैठकीत सांगितले. 

चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव कांचनवाडी या चार प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांच्या निविदा चार महिन्यांपूर्वीच मंजूर झाल्या आहेत. कांचनवाडी येथील गॅस प्रकल्पाला दोन महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली; मात्र हर्सूलची निविदा अद्याप प्रक्रियेतच आहे. शनिवारी (ता. 16) कचराकोंडीला वर्ष पूर्ण होणार असल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (ता. 15) आढावा घेतला. 
 
कुठे काय सुरू आहे... 

फक्त चिकलठाण्यात प्रगती 
बैठकीत श्री. काझी यांनी सांगितले, ""चिकलठाण्यात सिव्हीलचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर या ठिकाणी ठेकेदार कंपनीतर्फे मशीन बसविल्या जातील. मे महिन्यात किंवा जूनपूर्वी या ठिकाणी कचरा प्रक्रिया सुरू होईल.'' 
 
पडेगावला जागेचा वाद कायम 
पडेगावच्या जागेबाबत सुरवातीपासून वाद होता. वर्षभरानंतरही तो कायम आहे. या ठिकाणी महापालिकेने काही मांस विक्रेत्यांना भूखंड दिले होते. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. निकाल महापालिकेच्या बाजूने आला असला, तरी अद्याप वाद संपलेला नाही. शासनानेही या जागेवर प्रकल्प उभारण्यास स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हे आदेश मागे घेण्यात आले. 
 
हर्सूलची निविदा रखडली 
हर्सूल येथे दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली. हायक्‍युब या कंपनीची निविदा प्रशासनाने अंतिमही केली; मात्र ती स्थायीसमोर येण्यापूर्वीच रद्द करण्यात आली. कंपनीने दहा वर्षांचे काम असताना पाच वर्षांचे समजून दर भरले होते. आता नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. 
 
कांचनवाडीत जागेचा दिला ताबा 
कांचनवाडी येथील गॅस प्रकल्पाची निविदा दोन महिन्यांपूर्वी अंतिम करण्यात आली आहे. त्यानुसार जागेचा ताबा ठेकेदाराला देण्यात आला असून, प्रकल्पाचे नकाशे ठेकेदाराने महापालिकेला सादर केले आहेत. या नकाशांची तपासणी सुरू आहे. येत्या आठ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com