घाटी रुग्णालयाच्या एमआरआय खरेदीतील पेच सुटला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जिल्हा वार्षिक नियोजनातून 90 लाखांच्या खर्चाला मान्यता 

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नवे अत्याधुनिक थ्री टेसला एमआरआय यंत्र खरेदीतील पेच अखेर सुटला आहे. शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या 15 कोटींच्या निधीतून प्रस्तावित यंत्राची किंमत वाढल्याने ही खरेदी अडली होती. जिल्हा वार्षिक नियोजनातून घाटीसाठी मंजूर निधीतून 90 लाख रुपयांच्या खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे यंत्र खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

घाटीतील सध्याचे 1.5 टेसला एमआरआय कालबाह्य झाल्याने ते सतत नादुरुस्त होते. त्यामुळे महागड्या तपासण्यांसाठी रुग्णांना खासगीची वाट धरावी लागत होती. त्यामुळे रुग्ण नातेवाइकांचाही रोष सहन करावा लागत होता. हा विषय पाच फेब्रुवारी 2018 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत घाटी प्रशासनाने मांडला. त्यामुळे अर्थमंत्री व तत्कालीन पालकमंत्री यांनी या यंत्रासाठी शिर्डी संस्थानकडे विनंती करून 15 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा निधी मिळाल्यावर निधी हाफकिन महामंडळाकडे वर्ग करून वर्ष सरले. दरम्यान, प्रस्तावित यंत्राची किमत 16.16 कोटींची झाली. त्यामुळे एक कोटी 16 लाख कसे उपलब्ध करायचे, असा पेच निर्माण झाला होता. त्यानंतर प्रशासनाने कंपनीशी बोलणी करून 26 लाख रुपये किंमत कमी करून घेतली. तरीही 90 लाखांचा निधी लागणार होता. तो निधी डीपीसीतून देता येत असल्याने घाटीसाठी मंजूर निधीतून तो देण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी डीएमईआरला दिला. त्यानंतर त्याला राज्य शासनाने शुक्रवारी (ता.13) मंजुरी दिली. त्यामुळे आता यंत्र खरेदीला गती मिळाली असून, नव्या यंत्रामुळे घाटीतील रुग्णांना महागड्या व अत्याधुनिक तपासणी स्वस्तात उपलब्ध होणार आहे. 
 
सातशे रुपयांत एमआरआयची योजना बंद? 
घाटीत नावीन्यपूर्ण योजनेतून सुरवातीला 700 तर नंतर 900 रुपयांत एमआरआयची सुविधा घाटीत दिली जात होती. शासनाने निर्धारित केलेल्या शुल्काच्या अतिरिक्त 11 रुपये जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या निधीतून खर्च करण्यात येत होते; मात्र यंदा या योजनेसाठी निधी न मिळाल्याने या योजनेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची एमआरआयसाठीच्या शुल्कासाठी परवड होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Ghati hospital