झाडाच्या बुंध्यामध्ये डाॅक्टरचे अस्थिविसर्जन 

जगदीशचंद्र जोशी
गुरुवार, 11 जुलै 2019

माणसाच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन वाहत्या पाण्यात केले जाते. मात्र ही रक्षा नदीपात्रात करण्याऐवजी शेतात किंवा वृक्षारोपणासाठी वापरावी, अशी भूमिका डॉ. राजेश मुंदडा यांनी सातत्याने जपली. त्यांचे नुकतेच निधन झाले असून, कुटुंबीयांनी त्यांच्या असिंथचे विसर्जन शेतात केले. वृक्षारोपण करुन झाडाच्या बुंध्यामध्ये रक्षा विसर्जित करीत मुंदडा कुटुंबीयांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली. 

शिराढोण (जि. उस्मानाबाद) -  मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन वाहत्या पाण्यात केले जाते. मात्र ही रक्षा नदीपात्रात करण्याऐवजी शेतात किंवा वृक्षारोपणासाठी वापरावी, अशी भूमिका डॉ. राजेश मुंदडा यांनी सातत्याने जपली. त्यांचे नुकतेच निधन झाले असून, कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन शेतात केले. वृक्षारोपण करून झाडाच्या बुंध्यामध्ये रक्षा विसर्जित करीत मुंदडा कुटुंबीयांनी त्यांना श्रद्धाजंली अर्पण केली. 

मृत व्यक्तीची अस्थिरक्षा परंपरेप्रमाणे वाहत्या नदीपात्रात किंवा तीर्थक्षेत्राच्या जलाशयात विसर्जन केली जाते. मात्र त्यामुळे पाणी अस्वच्छ होऊन प्रदूषण होते, त्यामुळे असे करणे टाळायलाच हवे. अशा प्रथेला फाटा देत मृतावर अग्निसंस्कार केल्यानंतर रक्षा पाण्यात विसर्जित न करता ती वृक्षारोपणासाठी उपयोगात आणावी, यामुळे पावित्र्यही जपले जाते, तसेच मृताच्या आठवणीही राहतात, अशी भावना डॉ. राजेश मुंदडा यांची होती. 

आपल्या हयातीत त्यांनी याबाबत जनजागृती केली. डॉ. मुंदडा यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. कुटुंबीयांनी विधीवत अंत्यसंस्कार केले; मात्र तिसऱ्या दिवशी अस्थींचे विसर्जन नदीपात्रात करण्याऐवजी शेतात वृक्षारोपण करीत रक्षा वृक्षाच्या बुंध्याला टाकून वृक्षारोपणाचा स्तूत्य उपक्रम राबवत कुटुंबीयांनी डॉ. मुंदडा यांना श्रद्धाजंली अर्पण केली. यासाठी प्रकाशचंद्र मुंदडा, प्रतीक मुंदडा, कृष्णा मुंदडा, डॉ. किशोर सोनी, डॉ. श्रीकांत सोनी यांनी पुढाकार घेतला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about immersion of ashes