चार इच्छुकांनी दिल्या मुलाखती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पूर्व विधानसभा मतदारसंघाचे संघटक राजू वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह वैजापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 26) मुंबईत "मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत मुलाखती दिल्या.

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पूर्व विधानसभा मतदारसंघाचे संघटक राजू वैद्य, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्यासह वैजापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 26) मुंबईत "मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत मुलाखती दिल्या. लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या 19 ऑगस्टला मतदान होणार आहे. यासाठी शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शुक्रवारी दुपारी इच्छुक उमेदवारांच्या "मातोश्री'वर मुलाखती झाल्या. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतंत्रपणे इच्छुकांशी आधी चर्चा केली. अर्जुन खोतकर, राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी व वैजापूर येथील प्रकाश चव्हाण यांनीदेखील इच्छुक म्हणून या मुलाखतीला हजेरी लावली होती. सुभाष देसाईंनी इच्छुकांशी चर्चा केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. निवडून येण्याची क्षमता, रणनीती आदींवर चर्चा झाली. लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी या इच्छुकांना सांगितले. 

त्याबरोबरच उमेदवारी कुणालाही मिळो, विजय आपलाच झाला पाहिजे, असे बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र ते मुलाखतीसाठी नसल्याचे समजते. याउलट चर्चेत नसलेले वैजापूर नगर परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश चव्हाण यांचे नाव अचानक समोर आले. माजी आमदार आर. एम. वाणी यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षप्रमुखांकडे केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Interested candidates in election