शिंदे कुटुंबीयांच्या मदतीसाठी आता आचारसंहितेचा अडसर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

आचारसंहिता संपल्यानंतर मदतीचा धनादेश काकासाहेब यांच्या आई मीराबाई यांना दिला जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. आठ) सांगितले. 

औरंगाबाद - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने जाहीर केलेली मदत मिळण्यासाठी अडथळे सुरूच आहेत. सुरवातीला प्रशासनाने कायदेशीर अडचण समोर केली. पदाधिकारी-नगरसेवकांच्या हमीनंतर धनादेश तयार करण्यात आला. मात्र, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अडसर निर्माण झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर मदतीचा धनादेश काकासाहेब यांच्या आई मीराबाई यांना दिला जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. आठ) सांगितले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून पाण्यात उडी घेत हौतात्म्य पत्करले. यानंतर शहरात प्रमोद होरे, उमेश एंडाईत, कारभारी शेळके हेही हुतात्मा झाले. महापालिकेने या सर्वांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली होती; मात्र अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत राजेंद्र जंजाळ यांनी जाब विचारला होता. त्यावेळी महापौरांनी दोन दिवसात मदत दिली जाईल, असे जाहीर केले. मात्र महापौर मदत निधी या हेडसाठी शासनाची मंजुरी घेणे आवश्‍यक आहे, असे सांगत प्रशासनाने त्यात खोडा घातला.

अखेर सभागृहाने मदत देण्यासंदर्भात जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रशासनाने दहा लाख रुपयांचा धनादेश शिंदे यांच्या आई मीराबाई शिंदे यांच्या नावाने तयार केला आहे. आचारसंहिता संपताच हा धनादेश शिंदे यांच्या कुटुंबास देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Kakasaheb Shinde family