खंडोबाच्या मूर्तीचे पालखीतून आगमन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • मानकऱ्यांमध्ये परंपरेनुसार लेखी करार 
  • नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात आगमन 
  • 10 व 11 जानेवारीला साजरा होणार यात्रोत्सव 

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) : श्री खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरातून नळदुर्ग (मैलारपूर) येथील मंदिरात गुरुवारी (ता.28) पहाटे चार वाजता वाजत-गाजत पालखीतून आगमन झाले. यावेळी मूर्ती देवाणघेवाणीबाबत नळदुर्गचे मानकरी व अणदूरचे मानकरी यांच्यामध्ये पूर्वापार चालत आलेला लेखी करार झाला. नळदुर्गकरांनी मैलारपूर मंदिर मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. 

मानकऱ्यांमध्ये लेखी करार
श्री खंडोबा व बाणाईचा विवाह नळदुर्ग येथे झाल्याची आख्यायिका असल्यामुळे नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाच्या भाविकांसाठी महत्त्वाचे क्षेत्र आहे. श्री खंडोबाचे सव्वादहा महिन्यांसाठी नळदुर्ग येथे वास्तव्य असते. उर्वरित महिने अणदूरला देवाची मूर्ती असते. अणदूर येथील यात्रा बुधवारी (ता. 27) मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली. बुधवारी रात्री छबिन्याची सांगता होऊन नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन झाले. अणदूर व नळदुर्ग या दोन्ही गावांच्या मानकऱ्यांमध्ये देवाची मूर्ती नेण्याचा, तसेच आणण्याचा लेखी करार करण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री म्हाळसा, हेगडीप्रधान, मार्तंड भैरव यांच्या मूर्ती नळदुर्गकडे मार्गस्थ झाल्या.

खुशखबर इथे आहेत नोकरीच्या एक लाख संधी

कसा असावा प्रकृतीनुरूप आहार, क्लिक करा

विधिवत पूजा करून मूर्तींची प्रतिष्ठापना

पहाटे तीन वाजता श्री खंडोबाची मुख्य मूर्ती पालखीतून नळदुर्गकडे मार्गस्थ झाली. पहाटे पाच वाजता मैलारपूर-नळदुर्गमध्ये आगमन झाले. त्यानंतर विधिवत पूजा करून सर्व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढील सव्वादोन महिने श्री खंडोबा मूर्ती मैलारपूर येथे वास्तव्यास असणार आहे. पौष पौर्णिमेस (10 व 11 जानेवारी) यात्रोत्सव साजरा होणार आहे. या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Khandoba Temple