घोडेबाजाराविरोधात प्रतिस्पर्धी दानवे-कुलकर्णी एकत्र, विधान परिषद निवडणूक

अंबादास दानवे, बाबूराव कुलकर्णी
अंबादास दानवे, बाबूराव कुलकर्णी

औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक म्हटले, की घोडेबाजार ठरलेलाच. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची पळवापळवी हा आतापर्यंतचा अनुभव. यावेळी मात्र जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गुरुवारी (ता. आठ) अचानक ट्‌विस्ट आले. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे व कॉंग्रेस आघाडीचे बाबूराव कुलकर्णी यांनी एकत्र येत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. दोघांनी संयुक्त निवेदन करीत निवडणुकीतील संभाव्य घोडेबाजार रोखण्याचे आवाहन करून नवी खेळी खेळली आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्रही पालटले आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात श्री. दानवे व कुलकर्णी यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यासाठी 19 ऑगस्टला मतदान होणार आहे. प्रत्येक निवडणुकीचा अनुभव पाहता नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा "भाव' वधारला होता. नेहमीप्रमाणे कोणत्या उमेदवाराकडून किती "रसद' मिळेल, यावर अनेकांचे विशेषतः अपक्षांचे लक्ष लागलेले होते; त्यात गुरुवारी दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकत्र येत या सर्वांना धक्का दिला. दानवे-कुलकर्णी गुरुवारी सकाळी शिवसेनेचे पूर्व विधानसभा मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांच्या घरी भेटले. त्यानंतर निवडणुकीतील संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी संयुक्त निवेदन दिले.

दोघांच्या या निर्णयामुळे निवडणुकीतील चित्रच पालटले आहे. निवडणुकीतील चुरसच नाहीशी झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि घोडेबाजार, उमेदवारांची पळवापळवी हे समीकरणच बनले होते. याला दानवे-कुलकर्णी यांनी छेद देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.  दरम्यान, महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्याकडे विजयासाठी आवश्‍यक संख्याबळ असले, तरी भाजपकडून दगाफटका होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यांनी बुधवारी (ता. सात) कॉंग्रेसचे निलंबित आमदार अब्दुल सत्तार समर्थकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केला. सत्तारांनी त्यांना आश्वासनही दिले. 

महायुतीकडे बहुमत 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडे 321, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 250 इतके संख्याबळ आहे. याशिवाय एमआयएम 28 आणि अपक्ष 57 असे एकूण 656 मतदार आहेत. संख्याबळावर नजर टाकली तर शिवसेनेचा विजय निश्‍चित समजला जातो. कॉंग्रेसला अपक्ष, एमआयएम आणि सत्तार समर्थकांना सोबत घ्यावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com