काळभैरवनाथास पावसासाठी साकडे, सात दिवस अखंड अभिषेक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्‍यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळभैरवनाथ-जोगेश्वरीच्या मुख्य मूर्तीस सात दिवस रात्रंदिवस अखंड अभिषेक घालण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. 12) प्रारंभ करीत भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, असे साकडे घालण्यात आले.

परंडा (जि. उस्मानाबाद) ः लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या तालुक्‍यातील श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळभैरवनाथ-जोगेश्वरीच्या मुख्य मूर्तीस सात दिवस रात्रंदिवस अखंड अभिषेक घालण्यात येत आहे. सोमवारपासून (ता. 12) प्रारंभ करीत भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, असे साकडे घालण्यात आले. मंदिरात शिवलीलामृत ग्रंथवाचन, संपूर्ण मंदिरास ओल्या पडद्याने प्रदक्षिणा चालू राहणार आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे; मात्र मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळाची गंभीर परिस्थिती आहे. पावसाअभावी पाणीप्रश्‍न गंभीर बनला असून, चारा उपलब्ध होत नसल्याने जित्राब कसे जगवायचे, या प्रश्‍नाने शेतकरी हताश झाले आहेत.

गतवर्षी दुष्काळामुळे शेतातून कुठलेही उत्पन्न न मिळाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट दूर होण्यासाठी भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे श्रीकाळभैरवनाथास घालून सलग सात दिवस अखंड जलधारा सोडून अभिषेक घालण्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. 

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन जनावरांना चारा-पाणी, तसेच शेतीसाठी पाणी मिळण्याकरिता धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. देवास साकडे घालण्यासाठी श्रीभैरवनाथ देवस्थानचे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी, सरपंच समिंदराबाई हांगे, समीर पुजारी, उपसरपंच अंगद फरतडे, धोंडीराम फले, आजिनाथ गुळमिरे, रवी गुळमिरे, गोवर्धन जगताप, भागवत नलवडे, बंडू हंगे, दादा फले व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Lord Kalbhairavnath