नागझरी कुंडातील पाण्याने खंडेरायाचा अभिषेक

अणदूर (ता. तुळजापूर) ः श्री खंडोबाच्या मूर्तीस अभिषेक घालण्यासाठी चार किलोमीटरवरील नागझरीच्या झऱ्यातून कावडीद्वारे पाणी आणताना अंकुश मोकाशे, शुभम मोकाशे.
अणदूर (ता. तुळजापूर) ः श्री खंडोबाच्या मूर्तीस अभिषेक घालण्यासाठी चार किलोमीटरवरील नागझरीच्या झऱ्यातून कावडीद्वारे पाणी आणताना अंकुश मोकाशे, शुभम मोकाशे.

उस्मानाबाद - श्रावण महिन्यात अणदूर (ता. तुळजापूर) येथील श्री खंडोबाच्या मूर्तीला चार किलोमीटरवरील नळदुर्ग (मैलारपूर) येथील नागझरीच्या कुंडातील पाणी कावडीने आणून अभिषेक केला जातो. भाविकांनी आधुनिक युगात कावडीने पाणी आणण्याची प्रथा कायम ठेवली आहे. यंदाचा मान पुजारी अंकुश सुभाष मोकाशे व शुभम कालिदास मोकाशे यांना देण्यात आला. 


नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यात नल आणि दमयंती हे राजा-राणी वास्तव्यास होते. दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबा मैलारपूरहून नळदुर्ग येथे प्रकट झाले; तसेच चंदनपुरीहून बाणाईस नळदुर्ग येथे आणून विवाह केला अन्‌ त्यानंतर जेजुरीस प्रस्थान केले, अशी आख्यायिका आहे. नल राजाने नळदुर्गजवळील बोरी नदीजवळ मंदिर बांधून श्री खंडोबाच्या स्वयंभू मूर्तीची प्रतिष्ठापना केली. खंडोबाची ही स्वयंभू मूर्ती नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजाजवळ सापडल्याचे सांगितले जाते. कालांतराने खंडोबाचे मंदिर अणदूर येथे बांधण्यात आले. त्यानंतर अणदूर अन्‌ नळदुर्गच्या ग्रामस्थांत खंडोबाच्या मूर्तीचा ने-आण करण्याबाबतचा करार झाला. खंडोबाच्या मूर्तीचे अणदूर येथील मंदिरात सव्वादहा महिने, तर नळदुर्ग येथील मंदिरात पावणेदोन महिने वास्तव्य असते. 


श्रावण महिन्यात एक आगळीवेगळी प्रथा आहे. खंडोबाच्या मूर्तीखाली महादेवाची पिंड आहे. हे शिवलिंग व श्री खंडोबाच्या मूर्तीस श्रावणात नागझरीच्या झऱ्यातील पाणी कावडीने आणून अभिषेक घातला जातो. मैलारपूर (नळदुर्ग) मंदिराजवळील डोंगरकपारीत असलेल्या या नागझरी कुंडाला बाराही महिने पाणी असते. 
यंदाचा मान अणदूरच्या पुजारी समाजातील अंकुश मोकाशे व शुभम मोकाशे यांना देण्यात आला. हे दोघे पहाटे तीन वाजता अनवाणी नागझरी कुंडाकडे पायी जातात. पहाटे चारपर्यंत नागझरीला पोचून दोन घागरींतून कावडीने पाणी आणून मैलारपूर मंदिरात जातात. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीस तांब्यातील पाणी घातल्यानंतर ते थेट अणदूरकडे प्रस्थान करतात. एकदा कावड उचलली की ती वाटेत कुठेही ठेवायची नाही, असा नियम आहे. अणदूरच्या मंदिरात पहाटे साडेपाचपर्यंत पोचतात. 
अणदूर येथील खंडोबाची दररोज सकाळी व रात्री आठ वाजता महापूजा होते. श्रावण महिन्यात दोन्ही महापूजेत खंडोबाच्या मूर्तीस नागझरीतील झऱ्याच्या पाण्याने अभिषेक केला जातो. श्रावणासह वर्षभर दोन वेळेस नित्यनियमाने पूजा होते, त्याचा मान माऊली मोकाशे यांना आहे. 

'खडी रविवार'चा उपवास 
अणदूरमध्ये श्रावणातील रविवारी उपवास केला जातो. सकाळी नऊ वाजता खंडोबाची पूजा आटोपल्यानंतर उपवास करणारे दिवसभर उभे राहतात. रात्रीची महापूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा घालून उपवास करणारे भाविक बसतात. तब्बल बारा तास उभे राहून हा उपवास केला जात असल्याने खडी रविवार असे म्हटले जाते. गावातील किमान दीडशे ते दोनशे भाविक "खडी रविवार'चा उपवास करतात. 

अणदूरच्या खंडोबास श्रावण महिन्यात नागझरी कुंडातील पाणी कावडीने आणण्याची प्रथा अनादी कालापासून सुरू आहे. ही प्रथा सध्याच्या आधुनिक युगातही कायम आहे. 
- सुनील ढेपे, सचिव, श्री खंडोबा मंदिर समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com