महावितरणचे एचटी कन्झ्युमर पोर्टल

अनिल जमधडे
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

वीजबिल अन्‌ वापराचेही करता येणार नियोजन 

औरंगाबाद : ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी महावितरणतर्फे सातत्याने विविध उपाययोजना केल्या जातात. अशाच उपाययोजनांचा एक भाग म्हणून उच्चदाब ग्राहकांना वीजबिलांची माहिती, ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा, वीजवापराचा सविस्तर तपशील तसेच वीजबिल किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने उच्चदाब ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे उच्चदाब ग्राहक पोर्टल (एचटी कन्झ्युमर पोर्टल) सुरू केले आहे. 

एचटी कन्झ्युमर पोर्टलवरून उच्चदाब ग्राहकांना स्वत:चा मोबाईल क्रमांक, ई-मेल व इतर तत्सम माहिती अद्ययावत करता येणार आहे. प्रतितास, प्रतिदिवस तसेच मासिक वीजवापराची माहिती आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बिल सिम्युलेशन मेनू व कम्पॅरिझन विथ पीअर्स हे दोन मेनू उच्चदाब ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बिल सिम्युलेशन मेनूद्वारे उच्चदाब ग्राहकांस आपल्या स्वत:च्या वीजवापराचे अंदाजपत्रक तयार करता येऊ शकते. त्यामुळे त्याला वीजवापराचा व त्याअनुषंगाने वीजबिलाचा पूर्वानुमान काढून तसे नियोजन करता येणे शक्‍य होईल.

या पोर्टलमध्ये कम्पॅरिझन विथ पीअर्स या मेनूद्वारे उच्चदाब ग्राहकांना त्याच्या उद्योगाशी संबंधित अन्य उद्योगांमधील वीजवापराची व स्वत:च्या वीजवापराची तुलना करता येईल. अशा विविध उपयुक्त माहितीचा लाभ उच्चदाब ग्राहकांना या पोर्टलच्या माध्यमातून घेता येणार आहे. हे पोर्टल महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about mahavitran