फादर दिब्रिटोंच्या निवडीचे साहित्य वर्तुळातून स्वागत

फादर फ्रान्सिस दिब्रिटो
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दरवर्षी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. मतमतांतरे, आरोप-प्रत्यारोप असे प्रकार घडत असतात; पण यावेळी कृतिशील विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव अनपेक्षितपणे समोर आल्यानंतर किंचितही विरोध झाला नाही, हीच त्यांच्या कार्याची सगळ्यात मोठी पावतीच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्य वर्तुळासह सामाजिक चळवळीतूनही त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. 
 

साहित्य महामंडळाकडून अशाप्रकारचे निर्णय फार पूर्वीच घेण्याची गरज होती. साहजिकच आजच्या साहित्य चळवळीवर त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले असते. पण ही चांगली सुरवात आहे. साहित्यविश्‍वातून निवडीचे स्वागत होत आहे, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. 
- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी निवड झाली, याचा मनस्वी आनंद आहे. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. दूरध्वनीवरून मी त्यांचे अभिनंदनही केले आहे. 
- डॉ. यू. म. पठाण, संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे खरोखर सद्भावनेचे लेखक आहेत. नेहमीच सगळ्यांशी सुसंवाद राहावा, अशी त्यांची कायमच भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. संमेलनाचा पूर्वाध्यक्ष म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. 
- फ. मुं. शिंदे, प्रसिद्ध कवी आणि माजी संमेलनाध्यक्ष 

फादर दिब्रिटो यांच्या रुपाने एका दुर्लक्षित राहिलेल्या सिद्धहस्त लेखकाला संधी मिळाली आहे. चिकित्सा, वैचारिकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे त्यांच्या लेखनातून हृदयंगम दर्शन घडते. रेव्हरंड टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांच्या परंपरेला शोभेल असे हे नाव आहे. मराठवाड्यातील साहित्य संमेलनात त्यांचे अध्यक्ष होणे, ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. 
- डॉ. दादा गोरे, कार्यवाह, मराठवाडा साहित्य परिषद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com