हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा मोहरम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

भिकार सारोळात जगदे कुटुंबीयांकडून पारंपरिकपणे साजरा 

उस्मानाबाद ः तालुक्‍यातील भिकार सारोळा गावामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन देणारा मोहरम सण जगदे कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. जगदे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी ही परंपरा चालवत आहे.

भिकार सारोळा गावामध्ये कोणीही मोहरम सण साजरा करीत नसल्याने गावातील माधव जगदे मोहरमच्या दिवशी आवर्जून बाहेरगावी जायचे. मात्र त्यांना पूर्वीपासूनच मोहरम सणावर श्रद्धा होती. एके दिवशी माधव जगदे यांना मोहरमला मान असलेली चंद्रकोर गावाच्या शिवारात आढळून आली. तेव्हापासून त्यांनी मोहरम साजरा करण्याची परंपरा सुरू केली. आता माधव जगदे यांची चौथी पिढी हा सण साजरा करीत आहे. दोन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. सोमवारी (ता. नऊ) रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी (ता.दहा) दिवसभर धार्मिक कार्यक्रम करून सायंकाळी सहा ते दहापर्यंत गावातून हलगीचा कडकडाट अन्‌ फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात आली.

मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडते. हा उत्सव पार पाडण्यासाठी बापू जगदे, अण्णा जगदे, भैरू जगदे, जनक जगदे, गणेश जगदे, सचिन जगदे, प्रभू जगदे, भास्कर जगदे, तानाजी जगदे, बालाजी मेदने, बंडू माने, विजय मेदने, अण्णा माने, शामीर शेख, मैनुद्दीन शेख यांच्यासह गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Mohram