आता कोणत्याही आरटीओमध्ये करता येणार परवान्यासाठी अर्ज

अनिल जमधडे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

नवीन कायद्यात चालकांना दिलासा 

औरंगाबाद - नवीन मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमावलीत अनेक बदल करण्यात आले आहेत. वाहन परवान्याच्या अनुषंगानेही काही बदल करण्यात आले आहेत; मात्र अद्याप संगणकीय ऑनलाइन प्रणालीत (सारथी) आवश्‍यक बदल झालेले नसल्याने आरटीओ कार्यालयाने वाहनांच्या नूतनीकरणाचे काम तूर्तास थांबवले आहे.

मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे नियम कडक झाले असले, तरी त्यासोबत वाहन चालकांसाठी या कायद्यात काही समाधानकारक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार वाहन परवान्यासाठी अर्ज आणि वाहन नोंदणी आता राज्यातील कुठल्याही आरटीओमध्ये करता येणार आहे. तसेच, वाहन परवान्याचे नूतनीकरण करायचे असल्यास वर्षभरात कधीही करता येणार आहे. 

ट्रान्स्पोर्ट श्रेणीतील वाहन परवाना पूर्वी तीन वर्षे मुदतीचा होता, आता हा परवाना पाच वर्षे मुदतीचा राहणार आहे. त्यामुळे चालकाला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयात येण्याची गरज राहणार नाही. परवान्याची मुदत संपल्यानंतर पुर्वी पाच वर्षापर्यंत दंड भरुन नुतनीकरण करण्यात येत होते आता मात्र एक वर्ष उलटले तर नविन शिकाऊ परवाना काढून प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे धोकादायक वाहन परवान्याची मुदत पुर्वी एक वर्षाची होती. ही मुदत वाढवून तीन वर्षांची करण्यात आली आहे; मात्र या नवीन बदलाच्या अनुषंगाने सारथी 4.0 या संगणकीय प्रणालीत अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच तूर्तास वाहन परवाना नूतनीकरण थांबवण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली. 
 

मोटार वाहन परवाना संपल्यानंतर पूर्वी पाच वर्षांपर्यंत दंड भरून नूतनीकरण करणे शक्‍य होते. आता मात्र एक वर्ष उलटले तर नव्याने शिकाऊ परवान्यापासूनची प्रक्रिया करावी लगणार आहे. त्यामुळे या संदर्भात अधिसूचना जारी झाल्यानंतर किमान महिनाभराचा वेळ देऊन एक वर्ष उलटलेल्या चालकांना संधी द्यावी. 
- राजेश कोटगिरे, राज्य उपाध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोशिएशन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about New Motor Vehicles Act