उमरगा पालिकेत आणखी एक अपहार उघडकीस

File photo
File photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : पालिकेतील तत्कालीन लेखापाल व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने केलेल्या जवळपास एक कोटी रुपयांचे अपहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पालिकेच्या चौकशी समितीने केलेल्या तपासणीत आणखी एक अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतचा चौकशी अहवाल पालिकेच्या चौकशी समितीने बुधवारी (ता. २६) उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. दरम्यान, पालिकेतील आर्थिक अपहाराचे एकापाठोपाठ एक प्रकरण उघडकीस येत असल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पालिकेत ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४९ लाखांचे अपहार प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचे एक कोटी रकमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत आणखी आठ लाख ६४ हजार ८०२ रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. आता नव्याने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. 

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

असा झाला आर्थिक अपहार 
पालिकेचे शहरातील शिवाजी चौकातील भारतीय स्टेट बँक शाखेत चीफ ऑफिसर, म्युनिसिपल कौन्सिल (प्रोफेशनल टॅक्स) या नावे खाते आहे. या खात्यात पालिका कार्यालयाच्या विविध कामांच्या देयकांच्या कपातीची रक्कम (प्राप्तिकर, जीएसटी, व्यवसाय कर) जमा करण्यात येते. या खात्यातून प्राप्तिकर (इन्कम टॅक्स टीडीएस) व गौण खनिज कर ऑनलाइन पद्धतीने शासन खाती जमा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर केल्याची बाब या खात्याच्या बँक स्टेटमेंटवरून निदर्शनास आली आहे.

या बँक खाते क्रमांकाच्या माहितीमध्ये ७८dhammapal@gmail.com हा पालिका कार्यालयाशी संलग्न नसलेला ई-मेल आयडीवरील खात्यास अद्ययावत करण्यात आला होता. त्यामुळे बँक खात्यावर होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पालिकेकडून कोणत्याही कामची देयके अथवा खरेदी बिले ठेकेदारास, पुरवठादारास इंटरनेट बँकिंग पद्धतीने अदा करण्यात येत नाहीत. परंतु या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.

या खात्यामार्फत www.mahatenders.gov.in संकेतस्थळावरील टेंडर फीस, इसारा रक्कम भरणा केल्याच्या नोंदी बँक स्टेटमेंटच्या अहवालावरून निदर्शनास आले आहे. दरम्यान, चौकशी समितीने प्रथमदर्शनी निदर्शनास आलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या नोंदीचे विवरणही पोलिसांकडे दिले आहे. त्यात ३४ ट्रॅन्झॅक्शनद्वारे ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा अपहार केल्याचे दिसते. 

दोन फर्मसह पाचजणांविरुद्ध तक्रार 
प्रथमदर्शनी बँक स्टेटमेंटच्या व्यवहार नोंदीवरून तसेच बँकेच्या पत्रव्यवहारावरून तत्कालीन लेखापाल विनायक वडमारे, नंदेशकुमार झांबरे, धम्मपाल ढवळे यांच्यासह श्री. महाशुभप्रदा प्रा. लि. व नोव्हा कोअर टेंडरिंग प्रा. लि. यांनी संगनमत करून इंटरनेट बँकिंगचे युजर आयडी व पासवर्डचा परस्पर गैरवापर करणे, खासगी ई-मेल आयडी पालिकेच्या बँक खात्याला संलग्न करणे, वैयक्तिक खरेदी व देणे अदा करण्यासाठी शासकीय रक्कम इतरत्र वळवून वापर करून ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

याप्रकरणी दोन फर्मसह पाचजणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार चौकशी समितीतील मुख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रवींद्र सोनवणे, हरीशकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले आहे. दरम्यान, दोन फर्म या सचिन काळे, पवन मात्रे यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com