भररस्त्यावर झोपा काढू आंदोलन

उमरगा : सोमवारी नागरिकांनी भररस्त्यावर झोपा काढू आंदोलन केले.
उमरगा : सोमवारी नागरिकांनी भररस्त्यावर झोपा काढू आंदोलन केले.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील पतंगे रस्त्याच्या डांबरीकरण व नालीच्या कामाला दिरंगाई करीत पालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 17) पतंगे रोड रहिवाशी संघर्ष समितीच्या वतीने भररस्त्यावरच झोपा काढू आंदोलन केले.

नगरपालिका प्रशासनाने शहरातील पतंगे रस्त्याचे महामार्गापासून बसवेश्वर विद्यालयापर्यंत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यापैकी महामार्ग ते एल. डी. औरादकर यांच्या घरापर्यंतच्या पाचशे मिटरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम मंजूर केले होते. या कामाची निविदी प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप काम सुरू झालेले नाही.

रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने नागरिकांना मणक्‍याचे आजार भेडसावत आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी देऊनही कुठलीही दखल न घेता जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. यापूर्वी या भागातील नागरिकांनी नोव्हेंबरमध्ये हलगी मोर्चा काढला होता. त्या वेळी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस दिली होती. त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी दगड आणून टाकण्यात आले; मात्र हे काम एल. डी. औरादकर यांच्या घरापर्यंत होणार असल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे राष्ट्रीय महामार्ग ते महात्मा बसवेश्वर शाळेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण व नालीचे संपूर्ण काम करण्याची मागणी केली.

एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी पत्र नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी दिल्यानंतर आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले होते. त्यालाही दोन महिने होऊन गेले तरीही पालिकेकडून कामाबाबतच्या हालचाली गतीने केल्या नाहीत. त्यामुळे पतंगे रोड रहिवाशी संघर्ष समितीच्या वतीने पालिकेच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ सोमवारी रस्त्यावर झोपा काढू आंदोलन केले.

या आंदोलनात समितीचे अध्यक्ष मनोजकुमार जाधव, उपाध्यक्ष सुनिल औरादकर, सचिव आर. सी. पाटील, बाळासाहेब माने, माजी नगरसेवक दत्ता रोंगे, प्रा. सुग्राव बेंबळगे, प्रा. शिवाजीराव वडणे, ऍड. राजीव गणगे, सुशील दळगडे, प्रभाकर सगर, विवेकानंद माळी, भिम मोहिते यांच्यासह पाचशे नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान नगराध्यक्षा टोपगे, मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी आंदोलकर्त्यांची भेट घेऊन एप्रिल महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com