सव्वासहा कोटींचा आणखी एक घोटाळा?

File photo
File photo

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. बळिराजा चेतना अभियानातील सव्वासहा कोटी रुपयांची पुस्तके छापल्याची चर्चा आहे; मात्र ही पुस्तके अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाहीत; मात्र ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी असल्याने शासनाकडून अनेक योजना जाहीर केल्या जातात. बळिराजा चेतना अभियान हा त्याचाच एक भाग आहे. गेल्या सहा वर्षांत या अभियानाच्या माध्यमातून काही योजना राबविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षातही या अभियानात कोट्यवधींची रक्कम जिल्हास्तरावर आली होती. यातील सव्वासहा कोटी रुपयांची पुस्तके छापण्यात आल्याची चर्चा आहे.

पुण्यातील एका कंपनीला याचा ठेका दिल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात एकाही पुस्तक दाखल झालेले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बळिराजा चेतना अभियानात शेतकऱ्यांचाच बळी दिल्याचे दिसून येत आहे. 

सव्वासहा कोटी गायब 
शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे, त्यांना पुस्तकांच्या माध्यमातून दर्जेदार माहिती मिळावी, या उदात्त हेतूने पुस्तक छपाईचा कार्यक्रम जिल्हाधिकारी स्तरावर घेण्यात आला. तब्बल सव्वा कोटी रुपयांची रक्कम खात्यावरून पुस्तक छपाईसाठी देण्यात आली आहे. पुस्तक छपाई करण्याऐवजी स्वतःच छापून घेतले असल्याची चर्चा शेतकरीवर्गात सुरू आहे. जिल्ह्यात एकही पुस्तक दाखल झालेले नसताना ठेकेदाराला मात्र सव्वासहा कोटी रुपये देण्यात आले असल्याची चर्चा आहे. 

घोटाळ्यांचा जिल्हा? 
देशातील मागास जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. येथील नागरिकांची उन्नती व्हावी, यासाठी विविध योजना राबविल्या जातात; मात्र अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संगनमताने असे प्रकार करीत असल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात एक घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता दुसऱ्या एका घोटाळ्याने जिल्ह्याची ओळख घोटाळ्यांचा जिल्हा म्हणून होऊ लागली आहे. दरम्यान, यावर आता काय कारवाई केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेचा डीआरडीए विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांच्यामार्फत ही मोहीम राबविली. यामध्ये डीआरडीएने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तर तहसील कार्यालयाने पुस्तकांचे वाटप केले आहे. 
- राजेद्र खंदारे, निवासी उपजिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com