esakal | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

तेलंगणाच्या नागरिकांना गावाकडे पाठविण्यासाठी बैठकीत चर्चा झाली.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा व लोहारा तालुक्यांत आगामी काळात खबरदारी म्हणून विविध उपायोजना करण्यासंदर्भात शनिवारी (ता. २८) तहसील कार्यालयात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. 
उमरगा व लोहारा येथील गटविकास अधिकाऱ्यांना गावपातळीवर पुणे, मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईमध्ये ठेवणे, गावात जंतुनाशक फवारणी करणे, जनजागृती करणे, याकडे दक्ष राहण्याच्या सूचना फोनवरून देण्यात आल्या. ज्या खासगी डॉक्टरांचे वय साठपेक्षा कमी आहे, अशा सर्वांनी त्यांची रुग्णसेवा चालू ठेवणेबाबत निर्देश देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा - गरजूंसाठी दानशुरांनी मदत करावी : जिल्हाधिकारी

कोरोना संशयित किंवा रुग्णांची संख्या भविष्यात वाढल्यास होम क्वारंटाईन व आयसोलेशनसाठी तयारी करण्याचे बैठकीत नियोजन झाले. होम क्वारंटाईनसाठी बहुजन हिताय वसतीगृह (५० खाट), समाजकल्याण विभागाचे मुलींचे वसतीगृह (५० खाट), मागासवर्गीय विद्यार्थी निवासी शाळा, मुरूम (शंभर खाट), मागासवर्गीय विद्यार्थी निवासी शाळा, लोहारा (शंभर खाट) या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास भारत शिक्षण संस्था, श्रमजीवी शिक्षण संस्था (उमरगा), श्रीकृष्ण शिक्षण संस्था (गुंजोटी), ज्ञानप्रबोधिनी (हरळी), भानुदासराव चव्हाण महाविद्यालय (लोहारा) आदी खासगी महाविद्यालयांत प्रत्येकी पन्नास खाटांची सुविधा करणेबाबत उपायोजना आखण्यात येणार असल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले.

हेही वाचा - नागरिकांच्या मदतीला पोलिसांची हेल्पलाईन

सध्या आयसोलेशन वार्डची उपलब्धता उपजिल्हा रुग्णालयात पन्नास खाट, मुरुम, लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी पंधरा खाट, स्पर्श रुग्णालयात (सास्तूर) दहा खाट आहेत. या व्यतिरिक्त आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालयाचे वार्ड राखीव ठेवण्यात येणार आहेत. 

व्हेंटिलेटर्स वाढविण्यासाठी पाठपुरावा 
सध्या शासकीय व खासगी रुग्णालय मिळून बाराच व्हेंटिलेटर्स आहेत. सुरक्षा किटची संख्या केवळ दहा आहे. कदाचित परिस्थिती गंभीर झाल्यास व्हेंटिलेटर्स व सुरक्षा किटची आवश्यकता असल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक, यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यात आली. कोरोनासंदर्भात विविध उपाययोजनांसाठी पन्नास लाख रुपयांचा आमदार निधी देणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. 

परराज्यातील मजूरांच्या सुटकेसाठी झाली चर्चा 
कर्नाटक सीमेलगत खसगी (ता. उमरगा) येथे मुंबई, पुणे येथुन तेलंगणा राज्यात आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवता येऊ शकते का नाही याबाबत तेलंगणा येथील आमदार बी. व्ही. रामाराव व एस. आर. रेड्डी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. प्रशासकीय स्तरावरून याबाबत प्रयत्न व्हावेत, अशी सूचना आमदार चौगुले यांनी केली. खसगी ग्रामपंचायतीला अडकून राहिलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करणेबाबत सूचना देण्यात आल्या.

बैठकीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा गुरव, तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक माधवराव गुंडीले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडित पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, युवा नेते किरण गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे आदी उपस्थित होते.