बी-बियाणे, खतांची दुकाने दोनपर्यंत सुरू राहणार

File photo
File photo

उस्मानाबाद : जीवनावश्यक वस्तूंच्या अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील बी-बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, बीज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगिक बियाणे पॅकिंग, हाताळणी केंद्र, बीज परीक्षण प्रयोगशाळा लॉकडाऊनच्या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी परवानगी दिली आहे. 

राज्य शासनाने महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम प्रसिद्ध केले असून, यातील नियमानुसार कोरोना विषाणूमुळे उद्‍भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कलम १४४ अन्वये आदेश पारित केला आहे. तसेच लॉकडाऊनचा आदेश पारित केला असून, भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.

दुकाने, आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार बियाणे व खते या कृषी निविष्ठांचा जीवनावश्यक वस्तू कायद्यांअंतर्गत समावेश आहे. बियाणे व खते या कृषी निविष्ठांचा वापर कृषी मालाच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक असल्याने बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, बीज प्रक्रिया केंद्र, बियाणे पॅकिंग, हाताळणी केंद्र, बीज परीक्षण प्रयोगशाळा लॉकडाऊनच्या कालावधीत सुरू ठेवणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील बी-बियाणे व खतविक्री करणारी दुकाने या काळात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश पारित केले आहे.

लॉकडाऊनच्या काळामध्ये वेळेत बाहेर पडता यावे याकरिता तालुक्यातील बी-बियाणे व खतांचे विक्रेते, बीज प्रक्रिया केंद्र, त्याअनुषंगाने बियाणे पॅकिंग, हाताळणी केंद्र, बीज परीक्षण प्रयोगशाळा येथील कर्मचाऱ्यांची यादी तालुका कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती यांनी संबंधित पोलिस ठाणे व तहसीलदार यांच्या कार्यालयास सादर करावी, या आदेशाची अंमलबजावणी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत तत्काळ लागू राहील, असे आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com