मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाच्या चाव्या बारामतीहून फिरणार?

File photo
File photo

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या बारामतीवरून फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. माजी आमदार राहुल मोटे यांच्या गटाकडे असलेले सहा सदस्य निर्णायक आहेत. दरम्यान, राहुल मोटे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याने त्यांच्या आदेशावरून निर्णय होईल, असे बोलले जात आहे. 


उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे. जिल्ह्यात महाशिवआघाडी की भाजप याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मोटे हे अजित पवार यांच्या मर्जीतील असल्याने बारामतीकर कोणाच्या पारड्यात माप टाकतात त्यांच्याकडे अध्यक्षपद जाणार आहे. जिल्हा परिषदेत 55 सदस्य आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडे 26, कॉंग्रेस 13, शिवसेना 11, भाजप चार तर भारतीय परिवर्तन सेना एक असे बलाबल होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे बळ 17 अधिक चार असे झाले आहे. शिवाय शिवसेनेचे दोन सदस्य अडीच वर्षांपूर्वीच आमदार पाटील गटाकडे आले होते. सेनेच्या छाया कांबळे यांनी नुकतीच सेनेशी फारकत घेतल्याने तेही आमदार पाटील गटाकडे येऊ शकतात. परिणामी पाटील गटाचे संख्याबळ 24 वर पोचते. तर सांजा गटाचे सदस्य कैलास पाटील आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे महाशिवआघाडीचे संख्याबळ 29 राहते. एक अपक्ष (भापसे) सदस्य आहे.

दरम्यान, महाशिवआघाडीत राष्ट्रवादीचे नऊ सदस्य आहेत. यामध्ये सक्षणा सलगर, सुरेश बिराजदार आणि महेंद्र धुरगुडे राष्ट्रवादीसोबत असल्याने महाशिवआघाडीत येतील. तर उर्वरित सहा सदस्य मोटे गटाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत मोटे यांना शिवसेनेच्या प्रा. सावंत यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. मोटे गटाच्या सदस्यांनी आमदार पाटील गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे संख्याबळ 30 वर जाऊ शकते. तर मोटे यांचा गट महाशिवआघाडीसोबत गेला तर संख्याबळ 29 वर जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाची चावी मोटे यांच्याकडे असून, याची सूत्रे बारामतीवरून फिरतील, अशी चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com