परंडा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले हॉटेल व लग्न समारंभासाठी खासगी भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

परंडा (उस्मानाबाद) ः राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले हॉटेल व लग्न समारंभासाठी खासगी भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. शहरातील हिंदुत्ववादी संघटना, शिवप्रेमींच्या वतीने सोमवारी (ता. नऊ) पुकारलेल्या शहर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले हॉटेल, रिसॉर्ट लग्न समारंभासाठी शासनाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच, परंडा शहरातील अवैध धंद्याच्या ठिकाणी, ढाब्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची व मूर्तीची विटबंना होत असल्याने प्रशासनाने बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

शहरबंदला सकाळपासूनच सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांनी प्रतिसाद देऊन आपले दैनंदिन व्यवहार ठप्प ठेवले होते. दुपारी तीनच्या सुमारास तहसीलदार हेळकर यांना निवेदन दिल्यानंतर शहरातील बहुतांश दैनंदिन व्यवहार सुरू झाले. निवेदनावर राजेश काळे, धीरज ठाकूर, सूरज केदारे, अभिलाष सूर्यवंशी, राम निकत, सचिन कडबणे, शुभम पाटील, कानिफनाथ पाटील, नितीन जाधव, प्रमोद गटकूळ, कानिफनाथ कुदळे, नीलेश पालके, लक्ष्मण इनामे, आशिष पिंगळे, गजानन जाधव, गणेश बारसकर आदींसह 45 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Parnada City