राणाजगजितसिंह यांच्याकडून भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

उस्मानाबादेतील मेळाव्यात घोषणा 

उस्मानाबाद ः आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांना पाणी, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी सर्वांना बरोबर घेऊन सामर्थ्य वाढवायचे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. 

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. येथे समर्थकांचा शनिवारी (ता. 31) मेळावा घेऊन त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. माजी मंत्री पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, पंचायत समितीचे सभापती बालाजी गावडे, उपसभापती श्‍याम जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक सतीश दंडनाईक, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, "ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले दैवत आहेत. यापुढेही राहील. हृदयावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे. हा निर्णय घेताना आपण सगळेच भावनाविवश झालो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत असलो तरी प्रश्न मार्गी लागत नाहीत, हे वारंवार लक्षात येत गेले. यातील काही प्रश्‍नांबाबत अनेकवेळा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली. गेल्या वीस वर्षांपासून प्रश्‍न सुटत नसतील तर काय करायचे? विधानसभेसाठी 2009 मध्ये पराभव होऊनही नाउमेद झालो नाही. विचित्र परिस्थितीमध्ये संघर्षाची भूमिका घेऊन आजवर लढलो. आपले काही चुकले का, याचा विचार केला आणि हा निर्णय घेण्याची वेळ आली.' 
कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. आजवर वागणूक मिळाली तशीच ती यापुढेही मिळेल. मतप्रवाह वेगळे असतील; पण मी तुमच्यासोबत असेन, असेही ते म्हणाले. 
सुरेश देशमुख, अमोल पाटोदेकर, युवराज नळे, शिवदास कांबळे, मसूद शेख, संदीप मडके आदींनी मनोगत व्यक्त केले. 

आजवर कार्यकर्त्यांनी मला मोठी साथ दिली आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. राणाजगजितसिंह यांनाही अशीच साथ द्याल, अशी अपेक्षा. 
- डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about politics