विकास करण्यासाठी रोखले नव्हते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

शरद पवार यांची डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबावर टीका 

उस्मानाबाद ः जेव्हा सत्तेत होतो तेव्हा त्या-त्या जिल्ह्यांची जबाबदारी संबंधित नेत्यांवर असायची. शासनही त्यांच्या पाठीशी असायचे. तेव्हा विकास करण्यासाठी कोणीही रोखले नव्हते, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी डॉ. पद्मसिंह पाटील कुटुंबावर मंगळवारी (ता. 17) टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर श्री. पवार प्रथमच शहरात आले. शिंगोली विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. 
पक्षातील कुरघोड्या वेळीच रोखल्या असत्या तर पक्षावर अशी वेळ आली नसती, अशी टीका डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पत्रकाद्वारे केली होती. यासंदर्भातील प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, "डॉ. पाटील यांचा पक्षातील सर्वच सन्मान करीत होते. त्यांच्या कुटुंबीयांवर काही कुरघोड्या होत असतील, तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा अन्य कोणालाही सांगणे अपेक्षित होते.' लहान मुलांच्या बालबुद्धीला जास्त महत्त्व द्यायचे नसते, असे म्हणत पवार यांनी आमदार राणाजगजितसिंह यांनाही फटकारले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. गुन्हेगारी प्रकारच्या प्रकरणातील तपासात हस्तक्षेप कसा करायचा, कशी मदत करायची, असा उलटप्रश्‍न त्यांनी पत्रकारांना केला.

पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल सांगताना, "तरुणांना आम्ही संधी देण्याचा विचार करीत होतो. आता खऱ्या अर्थाने तरुणांना संधी मिळेल. तरुण पिढी पेटून उटलीय. त्यामुळे गेले ते बरेच झाले,' असे ते म्हणाले. आघाडीतील जागावाटप जवळपास निश्‍चित झाले असून, काही जागांची अदलाबदल करायची असल्याचे त्यांनी सांगितले. 
देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बेरोजगारी वाढत आहे. कारखाने बंद पडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. टीका करण्यातच सत्ताधारी समाधान मानत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. 
विधारपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार राहुल मोटे, विक्रम काळे, सतीश चव्हाण, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे आदी उपस्थित होते. 
कॉंग्रेसमुळे मनसे दूर 
आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घ्यायचे होते. मात्र, कॉंग्रेसकडून विरोध झाला. त्यामुळे सहकारी पक्षाच्या भूमिकेचा विचार केल्याने मनसेला सोबत घेतले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about politics