उस्मानाबाद मतदारसंघात अकरा उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

आघाडी, महायुतीच्या उमेदवारांत चुरशीची लढत 

उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना घाम फुटणार आहे. आघाडी आणि युतीमध्ये बंडखोरी झाली आहे.

उस्मानाबाद मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला होता. त्यामुळे 22 उमेदवार रिंगणात होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोर उमेदवारांकडे सर्वांच्या नजरा होत्या. याशिवाय अन्य कोण उमेदवार माघार घेणार, याचीही उत्सुकता होती. सकाळी अकरापासून तहसील कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांचा राबता होता. दुपारी एकपर्यंत अनेक उमेदवारांनी उमेदवारी कायम ठेवली होती.

दुपारी सव्वाएकपासून एक-एकजण उमेदवार अर्ज माघारी घेण्यासाठी तहसील कार्यालयात येत होते. अखेरच्या टप्प्यात 11 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. दरम्यान, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील आणि शिवसेनेचे अजित पिंगळे यांची उमेदवारी कायम होती. हे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेतात का, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर तीनपर्यंत दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले. परिणामी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले सुरेश पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने दोन्ही पक्षांना बंडखोरीने ग्रासल्याचे दिसून आले आहे. एका बॅलेट पेपरवर जास्तीत जास्त 16 उमेदवार असू शकतात. दरम्यान, 11 उमेदवार असल्याने मतदारसंघात एकच बॅलेट पेपर असणार आहे. 

निवडणूक रिंगणातील उमेदवारांची नावे
कैलास घाडगे-पाटील (शिवसेना-भाजप महायुती), संजय निंबाळकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस महाआघाडी), भिका विद्यागर (बहुजन समाज पक्ष), डॉ. संदीप तांबारे (संभाजी ब्रिगेड पक्ष), धनंजय शिंगाडे (वंचित बहुजन आघाडी), अजित खोत-पाटील (आम आदमी पक्ष), रघुनाथ कसबे (अखिल भारतीय एकता पक्ष), सिराजोद्दीन फतरू सय्यद (टिपू सुलतान पक्ष), दत्ता तुपे (अपक्ष), अजित पिंगळे (अपक्ष), सुरेश पाटील (अपक्ष).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about politics