'महायुतीची सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

'महायुतीची सत्ता आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'

उस्मानाबाद : महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अन्‌ शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नसल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महायुतीचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.


पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे, धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. ठाकरे म्हणाले, की वीस वर्षानंतर अजित पवार यांना बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याची चुक कळते. मग सुडाचे राजकारण कोणी केले याचा विचार जनतेने करावा. ज्यांच्या सत्तेच्या काळात जातीय दंगली पेटल्या तेव्हा तुम्ही काहीही केले नव्हते; परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य जनतेसाठी पुढाकार घेतला. ते प्रकरण दहा वर्षानंतर काढून शरद पवार यांच्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली होती. तेव्हा ते सुडाचे राजकारण नव्हते का, आता तुम्हाला तुम्ही केलेल्या घोटाळ्यामुळे कारवाईची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच पवार हे सरकारवर सुडाचे राजकारण करीत असल्याचे टिका करीत असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.


चांगल्या कामात शिवसेनेचा कायम पुढाकार आहे. भाजपला पाठींबा दिल्यामुळेच राज्याला सक्षम सरकार मिळाल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. यापुढेही महायुतीचे सरकार येणार असून, जनतेच्या कल्याणासाठी हे सरकार काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दहा रुपयांत जेवण देण्यात काय गैर आहे, आम्ही सामान्य जनतेच्या कल्याणाचा विचार करतो. स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांना हे चुकीचे वाटणार, असा टोला ही श्री. ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. 
सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांना आमदार, खासदार करणे हेच शिवसेनेचे उद्दिष्ट्य आहे. कैलास पाटील देखील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व आता आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच बंडखोरांच्या नादी लागू नका, असे म्हणत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक त्यांची जागा दाखवतील, असे ते म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com