रखडलेला एक भूयारी मार्ग

अनिल जमधडे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

चार महिन्याच्या वल्गना, वर्ष उलटले तरी काम होईना 

औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे भूयारी मार्गाचे काम रखडले आहे. गेल्या वर्षी चार महिन्यात भूयारी मार्ग करण्याचे अश्‍वासन रेल्वेच्या अधिाकऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटून काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे बीडबायपास परिसरातील हजारो नागरीकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

रेल्वे उड्डाणपुलानंतर रेल्वे फाटक बंद करण्याचा रेल्वेचा नियम आहे. त्यामुळेच संग्रामनगर उड्डाणपुलाचे काम पुर्ण केल्यानंतर दक्षिण मध्ये रेल्वेने संग्रामनगर रेल्वे फाटक बंद केले. फाटक बंद झाल्याने, या भागातील नागरीकांना शहरात येण्याचा मार्ग बिकट झाल्याने, येथील नागरीकांनी जनआंदोलन उभारले. खंडपीठात याचिका दाखल केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने संग्राम नगर उड्डाणपुलाच्या कामाची तयारी दर्शवली.

त्यानुसार तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते 12 ऑगस्ट 2018 रोजी भूमिपुजन करण्यात आले. कंत्राटदाराची सहा महिन्याची मुदत असली तरीही चार महिन्यात भूयारी मार्ग तयार करण्याचे अश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात कामाला सुरवात झाल्यानंतर अर्थवट अवस्थेत काम पडल्याने येथील मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन कामाला गती देण्याची मागणी केली, त्यावेळी पाऊस संपताच कामाला सुरवात करण्याचे अश्‍वासन देण्यात आले, प्रत्यक्षात आजुनही कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे नागरीकांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about railway