लोहारा तालुक्‍याला पावसाने झोडपले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

अवघ्या तीन तासांत 20.66 मिलिमीटरची नोंद

लोहारा (जि. उस्मानाबाद) ः तालुक्‍यातील अनेक भागांत गुरुवारी (ता. 10) पहाटे तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अवघ्या तीन तासांत सरासरी 20.66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तालुक्‍यात अधूनमधून पाऊस होत आहे. सुरवातीच्या काळात तब्बल एक महिना पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाची पेरणी उशिरा झाली. त्यानंतर तुरळक पावसावरच पिकांनी तग धरली; परंतु मोठा पाऊस झाला नव्हता. मात्र 24 सप्टेंबरपासून पावसाने तालुक्‍यावर चांगली कृपादृष्टी दाखवली. मुसळधार व अधूनमधून होणाऱ्या दमदार पावसामुळे जलस्रोतात मोठी वाढ झाली आहे. खरिपाची पेरणी उशिरा झाल्याने पिकांची काढणीही होत आहे. त्यात पाऊस होत असल्याने मूग, उडीद काढणीस व्यत्यय होत आहे. रास करण्यासाठी काढून ठेवलेल्या मूग, उडिदांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह तालुक्‍यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. पहाटे सुरू झालेला पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत होता. तालुक्‍यातील माकणी, जेवळी, सास्तूर, होळी, मुर्शदपूर, सालेगाव, हराळी, धानुरी, आष्टाकासार, कानेगाव, भातागळी, खेड, कोंडजीगड, माळेगाव या भागांत जोरदार पाऊस झाला. तर पांढरी, वडगाव, जेवळी या भागांत बुधवारी (ता.नऊ) सायंकाळी पाचच्या दरम्यान मोठा पाऊस झाला.

गुरुवारी सकाळी सातपर्यंत तालुक्‍यात सरासरी 20.66 मिलिमीटर पाऊस झाला. माकणी मंडळात सर्वाधिक 32 मिलिमीटर पाऊस झाला. त्या खालोखाल जेवळी मंडळात 23 मिलिमीटर तर लोहारा मंडळात सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत तालुक्‍यात एकूण सरासरी 705.66 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने तालुक्‍यातील पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असले तरी खरीप पिकांची काढणी सुरू असताना सतत पाऊस होत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about rain