मुरूम, दाळिंब मंडळांत अतिवृष्टी

अविनाश काळे
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

शेतात पाणी शिरल्याने सोयाबीन पाण्याखाली 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरासह तालुक्‍यात रविवारी (ता.20) मध्यरात्रीपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी (ता. 21) सकाळी दहापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. मुरूम व दाळिंब महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात नदी, नाले, तलावांत पाणी उपलब्ध आले असून, शेतात पाणी शिरल्याने काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले. 

शहरासह तालुक्‍यात कमी-अधिक प्रमाणात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस होत आहे. यंदा पावसाने विलंबाने हजेरी लावली. आता परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ऐन सोयाबीनच्या काढणीत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, रविवारी रात्रीच पावसाने सुरवात केली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. तो सोमवारी सकाळी सात ते दहापर्यंत कमी-अधिक प्रमाणात राहिला. मुरूम महसुल मंडळात सर्वाधिक 112 मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर दाळिंब महसूल मंडळात 76 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

या दोन महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, शेतशिवारांत पाणी साचले आहे. रानावरचे सोयाबीनचे पीक जमा करून सुरक्षितरीत्या एकत्रित ठेवूनही पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. 

मुरूम मंडळात 112 मिलिमीटर पाऊस 
शहरासह तालुक्‍यात सर्वदूर सारखा पाऊस झालेला नाही. मुरूम महसूल मंडळात 112, दाळिंब महसूल मंडळात 76, उमरगा महसूल मंडळात 33, मुळज सात, नारंगवाडी महसूल मंडळात 15 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी दहापासून दुपारी तीनपर्यंत ऊन पडले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about rain