जालन्यात होणार राज्यातील पाचवे प्रादेशिक मनोरुग्णालय 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

औरंगाबाद - मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे उभारण्यात येणार आहे. सुरवातीला 200 खाटांचे प्रस्तावित असलेले हे रुग्णालय आता रत्नागिरीच्या धर्तीवर उभारण्यासाठी 365 खाटांच्या सुविधेची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाशेजारची दक्षिणेकडील दहा एकर जागा रुग्णालयासाठी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

औरंगाबाद - मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे उभारण्यात येणार आहे. सुरवातीला 200 खाटांचे प्रस्तावित असलेले हे रुग्णालय आता रत्नागिरीच्या धर्तीवर उभारण्यासाठी 365 खाटांच्या सुविधेची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाशेजारची दक्षिणेकडील दहा एकर जागा रुग्णालयासाठी देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

निजाम राजवटीत जालन्यात मनोरुग्णालय होते. ते काळाच्या ओघात बंद पडले. त्यामुळे गंभीर, आक्रमक व बेवासर सोडून दिलेल्या मनोरुग्णांच्या उपचाराचा प्रश्‍न गंभीर बनला होता. सध्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आठशे ते हजार मनोरुग्णांना भरती करून उपचार करण्याची गरज पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील तोकड्या सुविधांशिवाय कोणताही पर्याय मराठवाड्यात नव्हता. त्यामुळे मनोरुग्णांना न्यायालयाने दाखल करण्याचे आदेश दिल्यावर पुण्याशिवाय पर्याय नव्हता.

शिवाय खासगीतील उपचार परवडणारे नसल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. तीन दशकांहून अधिक काळापासून मराठवाड्यात प्रादेशिक मनोरुग्णालय औरंगाबादेत उभारण्याची मागणी होती; मात्र राजकीय पाठबळाच्या अनास्थेने त्याकडे कायम दुर्लक्ष झाले. त्यामुळे मनोरुग्णांना आंतररुग्ण उपचार व पुनर्वसन समुपदेशनासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. 
 
ठरणार राज्यातील पाचवे रुग्णालय 
राज्यात सध्या पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी येथे प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. आता पाचवे मनोरुग्णालय जालन्यात मंजूर झाले. त्यासाठी आवश्‍यक दहा एकर जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. त्यातील दोन हेक्‍टर अगोदर मिळाली आहे; मात्र खाटांची संख्या 200 हून 365 झाल्याने यासाठी दहा एकर जागा लागणार आहे. त्यासाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पाठपुरावा केला. अतिरिक्त दहा एकर जागेची गरज असल्याने आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व सहसंचालक डॉ. भटकर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे मत मांडले. त्यामुळे त्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना मनोरुग्णालयाला तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. आठवडाभरात दहा एकर जागा मिळणार आहे. रत्नागिरीच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांपासून तर सफाईगारपर्यंत अशी 253 तज्ज्ञ डॉक्‍टर, अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदांचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालक कार्यालयाने अतिरिक्त संचालक डॉ. साधना तायडे यांच्याकडे सादर केला आहे. 
 
 

आरोग्याच्या पायाभूत सुविधाचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णलय उभारण्यात येत आहे. रुग्णालयासाठी दहा एकर जागा जालना जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. जागा मिळताच मनोरुग्णालयाचा आराखडा व अंदाजपत्रक सादर केले जाईल. 
- डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ औरंगाबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Regional psychiatric hospitals