रुजू झाले, अन सात मोटार वाहन निरीक्षक सुटीवरही गेले

अनिल जमधडे
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

औरंगाबाद आरटीओ कार्यालयासाठी 16 मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या केलेल्या 16 पैकी 7 मोटार निरीक्षक आरटीओ कार्यालयात रूजू झाले आहे.

औरंगाबाद,  : आरटीओ कार्यालयात बदलीने आलेले, सात मोटार वाहन निरिक्षक सोमवारी (ता. 16) रुजू झाले. तोकड्या मनुष्यबळात काम करणाऱ्या आरटीओ कार्यालयाला दिलासा मिळाला खरा, मात्र रुजू झालेले सर्व निरिक्षक सुट्या टाकुन निघुन गेल्याने सध्या तरी त्यांचा उपयोग होणार नाही. 

परिवहन विभागाने नुकत्याच सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांच्या पदोन्नत्या केल्या आहेत. या मध्ये औरंगाबाद आरटीओ कार्यालयासाठी 16 मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या केलेल्या 16 पैकी 7 मोटार निरीक्षक आरटीओ कार्यालयात रूजू झाले आहे. उर्वरीत मोटार वाहन निरीक्षक लवकरच रूजू होणार आहेत. सोमवारी रुजू झालेल्या निरिक्षकांमध्ये चंद्रकांत कुरे, राजू भोसले, भाग्यश्री देशमुख, अश्विनी खोत, स्वाती चव्हाण, हिना कौसर आणि रविंद्र नारळे यांचा सामावेश आहे. उर्वरीत नऊ मोटार वाहन निरीक्षक लवकरच रूजू होतील अशी अपेक्षा आहे. 

औरंगाबाद आरटीओ कार्यालयाला मोटार वाहन निरीक्षकांची 30 पदे, तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची 46 पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्षात मोटार वाहन निरीक्षकांची एकूण 11 पदे भरण्यात आलेली आहे. उर्वरीत पदे अद्यापही रिक्तच आहे. त्यापैकी चार मोटार वाहन निरीक्षक हे पदस्थापनेवर मुंबईला पाठविण्यात आलेले आहे. तर सहायक मोटार वाहन निरीक्षकांची संख्याही अवघी चारच आहे. दोन्ही मिळून 76 अधिकाऱ्यांपैकी केवळ 7 अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहेत. 
अवघ्या सात अधिकाऱ्यांमुळे कामावर प्रचंड ताण असल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. अशातच नविन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र रजा टाकून गेलेले अधिकारी पुन्हा रुजू होतील किंवा काहीजण वजन वापरुन पुन्हा अन्य आरटीओ कार्यालयात बदलीने जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about rto