रविवार बाजार; अडचणी अपार!

प्रकाश बनकर
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

औरंगाबाद: शहरातील सर्वांत जुना बाजार म्हणून ओळखला जाणार रविवार बाजार खुंटत चालला आहे. पावसाळ्यात चिखलात तर उन्हाळ्यात धुळीत हा बाजार भरतो. पूर्वी मोकळ्या जागेत भरणारा हा बाजार आता रस्त्यावर आला आहे. यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. कोणत्याच सुविधा मिळत नसल्यामुळे या बाजाराची "बाजारकोंडी' होत आहे. 

औरंगाबाद: शहरातील सर्वांत जुना बाजार म्हणून ओळखला जाणार रविवार बाजार खुंटत चालला आहे. पावसाळ्यात चिखलात तर उन्हाळ्यात धुळीत हा बाजार भरतो. पूर्वी मोकळ्या जागेत भरणारा हा बाजार आता रस्त्यावर आला आहे. यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरच दुकान थाटावे लागत आहे. कोणत्याच सुविधा मिळत नसल्यामुळे या बाजाराची "बाजारकोंडी' होत आहे. 

जुन्या वस्तूंबरोबर सर्वसामान्यांचा हक्‍काचा बाजार म्हणून रविवार बाजार ओळखला जातो. जाफर गेटजवळ हा बाजार भरविण्यात येतो. शहरातील सर्वांत स्वस्त आणि मस्त बाजार असल्यामुळे शहरातील विविध भागांतून नागरिक या बाजारात येतात. बाजारासाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे हा बाजार एका धार्मिक स्थळाच्या जागेवर भरत होता. आता त्या धार्मिक स्थळाची बांधणी झाल्यामुळे हा बाजार रस्त्यावर भरत आहे.

इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, लोखंडी वस्तूंपासून सर्वच गोष्टी किफायतशीरपणे या बाजारात उपलब्ध होतात. बाजारासाठी बांधण्यात आलेले ओटे हे भाजीपाला विक्री करणाऱ्यांना मिळतात. इतर दुकानदारांना रस्त्यावर बसावे लागते. अपुरी जागा, त्यात पावसाळा आल्यानंतर चिखलात आपले दुकान थाटावे लागत आहे. बाजार परिसरात आलेल्या रस्त्यांचीही दुर्दशा झाल्यामुळे त्यांचाही त्रास व्यावसायिक आणि ग्राहकांना सहन करावा लागत आहे. या अडचणी सोबत घेऊन कित्येक वर्षांपासून हा बाजार भरतो. 

महापालिकेचे दुर्लक्ष 

महापालिका हद्दीतील हा बाजार असल्यामुळे बाजारासाठीचा कर महापालिकेस द्यावा लागतो; मात्र कर घेऊनही महापालिका पाहिजे तशा सुविधा बाजारासाठी करण्यात आलेल्या नाहीत. बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होते. बाजार समितीत कचराकुंडी नसल्यामुळे रस्त्यावर कचरा केला जातो. बाजार संपल्यानंतरही तेथील कचरा उचलण्यात येत नाही. या प्रकाराकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. 

बाजारासाठी या सुविधांची गरज 
- स्वतंत्र पार्किंग व्यवस्था 
- बाजारात येणाऱ्या सर्व दुकानदारांना स्वतंत्र जागा द्यावी. 
- इलेक्‍ट्रॉनिक्‍स, कपडा, तसेच बाजारासाठी स्वतंत्र जागा असावी. 
- बाजारात येणाऱ्यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. 
- बाजारातून जाणारे प्रत्येक रस्ते सिमेंटचे करावेत. 
- बाजार परिसरात असलेले अतिक्रमण काढावे. 
- बाजाराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी नेमावेत. 
- पणन महामंडळाने पुढाकार घेत या ठिकाणी शेतकरी बाजार सुरू करावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Sanday Market